Politics News: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी (भाजप) आणि महायुती विरोधात तगडी रणनीती आखली आहे. अशातच आता शरद पवार यांनी भाजपचे नेते, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना शह देण्यासाठी तगडा उमेदवार शोधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली गिरीश महाजनांविरोधात तगडा उमेदवार निवडण्याचे ठरवले आहे. भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पसरली आहे.
दिलीप खोडपे हे जळगाव जिल्ह्यात प्रभावशाली मराठा नेता मानले जातात आणि जामनेर मतदारसंघात १ लाख ४० हजार मराठा मतदार आहेत. त्यामुळे शरद पवारांनी गिरीश महाजनांविरोधात मराठा कार्ड खेळण्याची रणनिती आखली आहे, असे राजकीय वर्तुळात सांगितले जात आहे.
शिवस्वराज्य यात्रा २१ तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार असून, या यात्रेदरम्यान खोडपे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवार स्वतः या प्रसंगी उपस्थित राहणार असून, यामुळे जळगावमध्ये तुतारी विरुद्ध कमळ असा हायहोल्टेज सामना होण्याची शक्यता आहे.