पारनेरला राज्य शासनाचा कोट्यवधींचा निधी | आ. टिळेकर धावले मदतीला | राणीताई लंके यांचा विधानसभेचा मार्ग सुकर होणार
पारनेर | नगर सह्याद्री:-
केंद्रात आणि राज्यात कोणाचीही सत्ता असली तरी मतदारसंघासाठी निधी उपलब्ध करणे आणि कामे मार्गी लावण्यात निलेश लंके यांचा हात राज्यात कोणीच पकडू शकत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आमदारकीचा राजीनामा फेकून दिल्यानंतर निलेश लंके हे भाजपा उमेदवाराला पराभूत करत खासदार झाले. राज्य शासनाशी निगडीत असणार्या विविध विकास कामांसाठी निधी देणार्या २५:१५ या योजनेसाठी आमदारांचे पत्र लागते. निलेश लंके हे सध्या खासदार आहेत. राज्य सरकारमध्ये ते आमदार नाहीत! मात्र, असे असले तरी त्यांनी अत्यंत चातुर्याने या योजनेचा निधी तालुक्यासाठी मिळवला! हा निधी मिळण्यासाठी त्यांना महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे अथवा काँग्रेस आमदाराची नव्हे तर भाजपा आमदार योगेश टिळेकर यांची मदत झालीय! आ. टिळेकर यांच्या पत्राच्या शिफारशीनुसार निलेश लंके यांनी या योजनेतून सुचविलेल्या विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची शिफारस राज्य सरकारने केली आहे. दरम्यान, खा. लंके यांनी आपल्यासाठी भाजपा आमदार देखील मदतीचा हात पुढे करत असल्याचे या कृतीतून दाखवून दिले असून त्यांच्या या अनोेख्या मैत्रीतील निधीचे आणि कामाचे तालुक्यात स्वागत होत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार असणार्या निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. भाजपा उमेदवार तत्कालीन खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात त्यांनी दंड थोपटले. अत्यंत चुरशीने ही निवडणूक झाली आणि त्यात विखे यांना पराभूत करत लंके यांनी थेट दिल्ली गाठली. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर निलेश लंके यांनी दिल्लीचा निधी मतदारसंघासाठी आणण्याचे काम सुरू केले. विविध रस्त्यांचे कामे तसेच केंद्राशी निगडीत योजनांचा लाभ मतदारसंघात देण्यासही त्यांनी प्रारंभ केला.
मात्र, त्याचवेळी खा. लंके यांनी आपल्या स्वत:चे होमग्राऊंड समजल्या जाणार्या पारनेर मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले. येणार्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या सौभाग्यवती राणीताई लंके याच उमेदवार असणार असल्याचे समोर येत आहे तशी जाहीर मागणीही त्यांच्या समर्थकांकडून होत आहे. राणीताई या शरद पवार गटाच्या उमेदवार असणार की ठाकरे शिवसेनेच्या याची अनौपचारीक घोषणा होणे बाकी आहे. मात्र, त्याआधी मतदारसंघासाठी निधी आणणे आणि कामे मार्गी लावण्यासाठी खा. लंके यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार गावोगाव मेळावे घेण्यासह जनतेशी थेट संपर्क वाढविण्यावरही लंके यांनी जोर दिला असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यात खा. लंके यांच्यासह त्यांच्या सौभाग्यवती राणीताई आणि खा. लंके यांचे बंधू दिपक लंके हे संपूर्ण पारनेर तालुक्यात पायाला भिंगरी बांधल्यागत फिरत आहेत आणि जनतेशी संपर्क ठेवून आहेत.
राज्य आणि केंद्रात सत्तेत नसलो तरी आपण कोठूनही निधी आणू शकतो आणि कामे मार्गी लावू शकतो हे खा. लंके यांनी याआधीच जाहीरपणे सांगितले होते. जिल्ह्याचा विचार करता पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून विरोधी खासदार या नात्यानेे त्यांना निधी मिळणे अवघड होते. मात्र, त्यावर मात करीत खा. लंके यांनी थेट विरोधातील भाजपा आमदाराकडूनच निधी मिळविण्यात यश मिळवले. योगेश टिळेकर यांची काही महिन्यांपूर्वीच विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली. खा. लंके यांनी त्यांच्याशी संपर्क केला आणि मतदारसंघात विकास कामांसाठी निधी देण्याबाबत पत्राची मागणी केली. योगेश टिळेकर यांनीही राजकीय मतभेद- राजकारण बाजूला ठेवत खा. लंके यांच्या पारनेर तालुक्यासाठी कोट्यवधींचा निधी देण्याबाबत राज्य सरकारला पत्र दिले. या पत्रानुसार संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी यंत्रणेला आदेश दिले असून आता या विकास कामांची भूमिपुजने देखील सुरू झाली आहेत. खा. लंके यांना भाजपा आमदार योगेश टिळेकर यांची साथ भेटल्याने तालुक्यातील विकास कामांचा रथ आणखी जोेमात सुरू झाला आहे. खा. लंके यांच्या अनोख्या कार्यपद्धतीने पारनेरकर सुखावले आहेत. खा. निलेश लंके यांच्या अनोखी मैत्री आणि त्यातून तालुक्याला येत असलेल्या निधीने आता राणीताईंचा मार्ग आणखी प्रशस्त होणार यात शंका राहिलेली नाही.