अहमदनगर । नगर सहयाद्री:-
अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक योगिराज शशिकांत गाडे यांनी शहरात सुरू असलेल्या सार्वजनिक कामांमध्ये ६० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. गाडे यांनी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना पत्र लिहून या भ्रष्टाचाराबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गाडे यांनी आपल्या पत्रात असे नमूद केले आहे की, शहरात सध्या ड्रेनेज, काँक्रीट रस्ते, डांबरी रस्ते इत्यादी कामे सुरू आहेत. परंतु, या कामांमध्ये शासकीय योजना व मंजूर अंदाजपत्रकानुसार कामे न होत असल्याचे दिसून आले आहे. निरीक्षणात खालील त्रुटी आढळल्या आहेत:रस्त्यांची मापे कमी केली जात आहेत.स्टीलच्या जाळ्यांचा वापर केला जात नाही.काँक्रीटच्या रस्त्यांसाठी प्लास्टिक पत्रे वापरले जात नाहीत.रस्त्यांची पातळी अंदाजपत्रकातील मापदंडानुसार नाही आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे.
या सर्व त्रुटींच्या आधारे अंदाजे ६० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा अंदाज गाडे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, करदात्यांच्या पैशांचा हा गैरवापर गंभीर असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे .शहरातील नागरिकांचे हित लक्षात घेऊन माजी नगरसेवक योगिराज गाडे यांनी महानगरपालिका प्रशासनाला तातडीने उत्तर देऊन या कामांवर योग्य तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.