पारनेर । नगर सहयाद्री:-
मुळा धरणाच्या सांडव्याद्वारे नदी पात्रामध्ये ओव्हरफ्लोचे पाणी नदी पात्रात सोडण्यात येत असून वाहून जाणारे हे पाणी मुळा उजव्या कालव्याला सोडण्याची मागणी खा. नीलेश लंके यांनी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
खा. लंके यांनी आपल्या पत्रात नमुद केले आहे की, मुळा उजवा कालव्याचे लाभक्षेत्र असलेल्या राहुरी, नेवासा, शेवगांव व पाथर्डी तालुक्यामध्ये अत्यल्प पाउस झाल्याने पाण्याची पातळी खालावलेली आहे. सद्यस्थितीमध्ये मुळा धरणातून ओव्हफलोचे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असून हे पाणी नदीपात्रातून वाहून जात आहे. वाहून जाणारे हे पाणी मुळा उजव्या कालव्याला सोडल्यास लाभ क्षेत्रामध्ये असलेल्या उभ्या पिकास फायदा होउ शकतो. तसेच पाणी पातळीमध्येही वाढ होउ शकते असे खा. लंके यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
मुळा धरणाची एकूण साठवण क्षमता २६ हजार दशलक्ष घनफुट, २६ टीएमसी इतकी असून सोमवार दि.१२ ऑगस्ट रोजी धरणाच्या परिचालन सुची नुसार १ ते १५ ऑगस्ट दरम्यान किमान पाणीसाठी २१ हजार २६४ दशलक्ष घनफुट तर कमाल पाणीसाठा २२ हजार ८१४ दशलक्ष घनफुट इतका नियंत्रीत ठेवणे आवष्यक आहे. त्यामुळे सोमावर दि. १२ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता धरणातून २ हजार क्युसेक्सने नदीपात्रात पाण्याचा सोडण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवष्यकता भासल्यास धरणातून टप्प्या टप्प्याने विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
नदी पात्रातून २ हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असून आवष्यकता भासल्यास विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने मुळा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी पात्रालगतची चल मालमत्ता, चीज वस्तू, वाहने, पशुधन, शेती अवजारेव इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्तलांतरीत करावी. नदीपात्रात प्रवेश करू नये. कुठलीही जिवित व वित्त हानी होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी केले आहे.