अहमदनगर। नगर सहयाद्री-
सौरभ जोशी महापालिकेचे नवे प्रभारी आयुक्त
आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याविरुद्ध लाच मागणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून ते महापालिकेत गैरहजर आहेत. आता त्यांचा पदाचा कारभार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्याकडे सोपविला आहे. तसा आदेश नगरविकास विभागाने सोमवारी सायंकाळी काढला. महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे व स्वीय सहायक श्रीधर देशपांडे यांच्याविरुद्ध आठ लाख रुपये लाच मागणीचा गुन्हा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आयुक्त डॉ. पंकज जावळे पसार आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तपद रिक्तच होते. महापालिका आयुक्त कार्यालयात उपस्थित नसल्याने त्याचा दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ नये, त्यासाठी महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कारभार अतिरिक्त आयुक्त डॉ. सौरभ जोशी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
नगर बाजार समितीत दोन दिवस बंद
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरहून निघालेला संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा मंगळवारी (दि. २) व बुधवारी (दि ३) नगर शहरात मुक्कामी येणार असून ४ जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या दिंडीमध्ये सुमारे ५० हजार वारकरी सहभागी असून, त्यांचा मुक्काम नगर बाजार समितीच्या भुसार व भाजीपाला यार्डवर असेल. त्या अनुषंगाने बुधवारी आणि गुरुवारी असे दोन दिवस बाजार समितीच्या मुख्य बाजाराचे भुसार व भाजीपाला बाजार बंद राहणार आहेत. शुक्रवारी (दि. ५) बाजार नियमित सुरू राहील. त्यामुळे भुसार, फळे भाजीपाला उत्पादक सर्व शेतकऱ्यांनी दोन दिवस शेतमाल यार्डवर विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे यांनी केले आहे.
वारकऱ्यांचा टेम्पोला अपघात; १५ भाविक जखमी
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर – पंढरपूर पायी दिंडी सोहळा सोमवारी डोंगरगण येथे मुक्कामी आला. दिंडीतील एक पिकअॅप दर्शनासाठी गोरक्षनाथ गडावर गेला होता. गडावरून परतत असताना पिकअॅप पलटी झाला. त्यात सुमारे दहा ते पंधरा भाविक किरकोळ जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. १) रोजी सायंकाळी वाजता घडली. मंदाबाई सुदाम थोरे (रा. गोळेगाव, ता. वैजापूर), शाहुबाई मगर (रा. श्रीरामपूर), इमल चांगदेव आंबले (रा. गोंडेगाव, ता.श्रीरामपूर), चांगदेव ज्ञानदेव आंबले, राजू मिसाळ, बाळासाहेब रंगनाथ खोपसे, संभाजी नासाहेब हरगुडे, भाऊसाहेब जगताप, नवनाथ तांबे, (ता. श्रीरामपूर) असे किरकोळ जखमी झालेल्या भाविकांचे नावे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. जखमींना तत्काळ उपचारासाठी नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दरोडेखोरांची टोळी गजाआड
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भाळवणी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेली बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांची टोळी पोलिसांनी गजाआड केली. आरोपींकडून तीन लाख ३५ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अमोल नवनाथ काळे (वय २३), शामुल ऊर्फ शौऱ्या नवनाथ काळे (वय २०, दोन्ही रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड), सतिष ऊर्फ मुन्ना लायलन भोसले (वय १९,) व भरत अब्दुल भोसले (वय ४०, दोन्ही रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड) असे अटक आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार मोहन निकाजी भोसले (रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड) हा मात्र फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींकडून तीन मोबाईल, दोन दुचाकी, कोयता, लाकडी दांडके, दोरी, मिरचीपुड असा तीन लाख ३५ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींच्या विरुद्ध आर्म अॅक्टसह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राळेगण थेरपाळ रस्त्यासाठी ११ कोटी निधी मंजुर
अनेक वर्षांपासून म्हसे खुर्द ते राळेगण थेरपाळ रस्त्याची अंत्यत दुरावस्था झाली होती.ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. आंदोलने, उपोषण देखील झाले त्यास अखेर यश येत या अर्थसंकल्पात या रस्त्याकरीता माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ११ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आसल्याची माहीती सरपंच पंकज कालखिले यांनी दिली.म्हसे खुर्द ते राळेगण थेरपाळ हा रस्ता साडेपाच किलोमीटर अंतराचा आहे. या दोन्ही रस्त्यावर जवळपास १२०० नागरिक वास्तव्यास आहेत रोजचे दळणवळण याच मार्गावरून त्यांना करावे लागते पावसाळ्यात तर अधिक कठिण परिस्थिती या रस्त्याची होते. ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याबद्दल माजी खा. डाॅ. विखे पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.