गावातील पशुधन जगविण्यासाठी अडीच एकरांतील उभा ऊस दिला मोफत; ऊस डोंगा परि रस नाही डोंगा’चा प्रत्यय
सुनील चोभे | नगर सह्याद्री
ऊस डोंगा परि रस नाही डोंगा का भुललासी वरिलिया अंगा
संत चोखा मेळा यांच्या अभंगातील या ओळी तंतोतंत आपल्या जीवनात अंगीकारल्या आहेत, त्या नगर तालुक्यातील खंडाळा या गावातील ऊस बागायतदार असलेले शेतकरी संदेश कार्ले आणि त्यांच्या कुटुंबाने. सध्या दुष्काळी स्थिती असल्याने नगर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्हा किंवा महाराष्ट्रातील अनेक भागांत जनावरांच्या चार्याची आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र जाणवत आहे. अशा वेळी आपल्या खंडाळा गावातील शेतकर्यांची जनावरे कशी जगवायची याची घालमेल चालू असताना संदेश कार्ले यांनी आपल्या नुकसानीचा मागचापुढचा विचार न करता आपल्या अडीच एकरांतील उभा ऊस गावातील शेतकर्यांची तोडून नेऊन जनावरांना चारा म्हणून घालावा व ती जगवावीत असे आवाहन केले आणि ते प्रत्यक्षात घडलेही.
संदेश कार्ले हे शेतकरीही आहेत आणि राजकारणीही. जिल्हा परिषदेचे सभासद आणि नंतर पंचायत समितीचे सभापती. पशुधन जगविण्यासाठी ते शासन दरबारी लढा देत आहेतच; परंतु शासनाची मदत मिळेल तेव्हा मिळेल सध्या काय याचा विचार करून त्यांनी आपला अडीच एकरांतील उभा ऊस गावातील शेतकर्यांना देऊन टाकला. ऊस डोंगा म्हणजे वाकडा असला तरी त्यातील रस ‘डोंगा’ म्हणजे ‘वाकडा’ नाही. असे संत चोखा मेळा यांनी म्हटले आहे. तद्वतच सगळेच राजकारणी लोक वाईट असतातच नाही तर त्यांच्या अंतरंगातही जनतेप्रति ओलावा असतो हेच संदेश कार्ले यांनी दाखवून दिले आहे.
पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, दुधाला कवडीमोल बाजार मिळतोय, पशुखाद्याच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. पशुधन जगवायचे कसे असा मोठा यक्ष प्रश्न शेतकर्यांसमोर उभा ठाकला आहे. शेतकर्यांप्रती आपण काही तरी देणे लागतो या भावनेने कार्ले कुटुंबाने गावातील शेतकर्यांना अडीच एकर ऊस मोफत देऊन शेतकर्यांना आधार देण्याचे काम केले आहे. कार्ले कुटुंबाने शेतकर्यांप्रती घेतलेला निर्णय खंडाळा गावातील शेतकर्यांसाठी मोठा आधार ठरला. तसेच शेतकर्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
नगर तालुक्यातील खंडाळा येथील संदेश कार्ले कुटुंबीय कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापतिपदाच्या माध्यमातून संदेश कार्ले यांनी शासनाच्या विविध योजना गरजूंच्या घरापर्यंत पोहोचविल्या. सभापतिपदाच्या काळात पुढार्यांची असणारी पंचायत समिती त्यांनी थेट गावागावांत पोहोचविली. जिल्हा परिषदच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लावली. योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्या. शेतकर्यांच्या मालाला भाव मिळत नाही म्हणून आंदोलनेही केली. कांद्याला भाव मिळवून देण्यासाठी रास्ता रोको आंदोलने केली.
परिणामी शेतकर्यांचा फायदाही झाला. शेतकर्यांसाठी आंदोलन केल्याने संदेश कार्ले यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. घोसपुरी पाणी पुरवठा योजनेच्या अध्यक्षपदी असतांना त्यांनी तोट्यात असलेली योजना नफ्यात आणली. घोसपुरी योजना सक्षमपणे चालवून राज्यात आदर्श घडवून दिला. वेळप्रसंगी स्वतः पाईपलाईन दुरुस्त करुन घोसपुरीसह १७ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे काम केले. माफक दरात पाणी उपलब्ध करुन दिले. दुष्काळात अनेक गावांच्या फळबागा जगविल्या.
सध्या लोकसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मतदान नुकतेच पार पडले आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेकांनी शेतकर्यांप्रती भावना व्यक्त केल्या. परंतु, संदेश कार्ले यांनी प्रत्यक्षात शेतकर्यांना मदत करून शेतकर्यांप्रती असणारे प्रेम व्यक्त केले. शेतातील अडीच एकर ऊस खंडाळा गावातील शेतकर्यांना मोफत दिला आहे. त्यांनी गावातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेतकर्यांना ऊस तोडून नेण्याचे आवाहन केले. शेतकर्यांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ऊस तोडून नेला. कार्ले कुटुंबाने केलेल्या या मदतीमुळे शेतकर्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
वडिलांचे शब्द काळजाला भिडले;अन कृती केली: संदेश कार्ले
सध्या दुधाला बाजार नाही. पशुधन जगविणे जिकिरीचे बनले आहे. पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. अशातच वडिलांनी नुसती भाषणे करु नको तर शेतकर्यांनाही मदतही करण्याचा सुला दिला. वडिलांचे शब्द प्रमाण मानत आपण शेतकर्यांप्रती काही तरी देणे लागतो म्हणून शेतातील अडीच एकर ऊस अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांच्या जनावरांना दिला. खंडाळा गावातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर पशुपालकांना ऊस तोडून नेण्याचे आवाहन केले. या कृतीमुळे शेतकर्यांना समाधान वाटले. अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना मदत करण्याचे आवाहनही माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी केले आहे.
दादाजी अॅक्वाच्या माध्यमातून पाच रुपयांत १० लीटर शुद्ध पाणी
नगर दौंड रस्त्यावर खंडाळा येथे संदेश कार्ले यांचे निवासस्थान आहे. निवासस्थानाशेजारी आद्य स्वामी शिवानंद दादाजी दरबार आहे. येथे भाविकांची नेहमीच गर्दी असते. येथे येणार्यांना भाविकांना व वाटसरूंची तहान भागावी या उद्देशाने दरबारसमोर दादाजी अॅक्वा नावाने आरओ प्लांट उभारला आहे. ५० पैशांमध्ये एक लीटर, एक रुपयात दोन लीटर, पाच रुपयांना १० लीटर शुद्ध फिल्टर पाणी दिले जात आहे. तीव्र दुष्काळी परिस्थितीत पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. अशा परिस्थितीत संदेश कार्ले यांनी दादाजी अॅक्वाच्या माध्यमातून सुरू केलेल्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.