अहमदनगर | नगर सह्याद्री
केडगाव उपनगरात सोनेवाडी रस्त्यावर एका पोलिस अधिकार्याच्या घरात चोरट्याने भरदिवसा चोरी करत सुमारे १३ तोळे दागिन्यांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
नगर येथे स्थानिक गुन्हे शाखेत काम केलेले व सध्या नाशिक येथे नियुक्तीस असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या घरात ही चोरी झाली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नी घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. त्यांच्या मातोश्रीही बाहेर गेलेल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्या घरी आल्यावर घराच्या दरवाजाची कडी तुटल्याचे दिसले. त्यांनी घरात पाहणी केली असताना चोरट्याने कपाटातील दागिने चोरून नेल्याचे समोर आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, कोतवाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. एकाच दुचाकीवर आलेले तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यातील दोघे घराबाहेर उभे होते व एकाने घरात जाऊन चोरी केली. चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी बारा वाजण्याच्या सुमारास घराची पाहणी केली. त्यानंतर डाव साधला. भरदिवसा ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.