निघोज / नगर सह्याद्री –
राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीची यात्रा उत्साहात सुरु. नवसपुर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या बगाडगाड्याच्या मिरवणूकीचा शेकडो महिलांनी आनंद घेतला असून हजारो भावीकांनी मळगंगा देवीचा जयजयकार करीत बगाडगाडा मिरवणूकीची शोभा वाढवली.
शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात बुधवार दि.१ मे पासून सुरू झाला. पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंत पुजारी गायखे कुटुंबांनी देवीची विधिवत पूजा केली. त्यानंतर संबळ वाद्यासहीत दुणगुले कुटुंबाने महाआरती केली. त्यानंतर अभिषेक करण्यात आला. पहाटे सहा पासून भावीकांनी देवी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदीरामध्ये दर्शन रांगेची व्यवस्था मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट व ग्रामस्थ तसेच मुंबईकर मंडळ यांनी केल्याने भावीकांना व्यवस्थीत मनोभावे देवीचे दर्शन घेता आले.
पहाटे सहा ते सायंकाळीं सात पर्यंत पंचवीस हजार पेक्षा जास्त भावीकांनी दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे. यावेळी असंख्य भावीकांनी गुप्तदान तसेच देणगी पावतीच्या माध्यमातून पन्नास रुपये ते पंचवीस हजार रुपये देणगी दिल्या आहेत. यात्रेच्या निमित्ताने पहिल्याच दिवशी लाखो रुपये देणगी देत मळगंगा देवीसाठी श्रद्धा व्यक्त केली आहे. दुपारी पाच वाजता मळगंगा मंदीरापासून बगाडगाड्याची मिरवणूक काढण्यात आली.
निघोज येथील जय मल्हार देवस्थान ट्रस्टच्या लंके मंडळाला या बगाडगाड्याचा मान असून देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पोपटराव लंके, सर्व पदाधिकारी तसेच ट्रस्टचे मार्गदर्शक बाबाजी आण्णा लंके, पांडाभाउ लंके व ट्रस्ट सचिव सचिन लंके यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनखाली या बगाडगाड्याचे मिरवणुकीचे नियोजन करण्यात येते. लंके मंडळाचे शेकडो युवक व ज्येष्ठ मंडळी या बगाडगाडा मिरवणूकीचे नियोजन करण्यासाठी परिश्रम घेत असतात.
मळगंगा मंदीर ते ग्रामपंचायत चौक तसेच देवीची हेमांडपंथी बारव अशाप्रकारे बगाडगाड्याची मिरवणूक काढण्यात आली यावेळी शेकडो महिलांनी बगाडगाड्यात बसून नवसपुर्तीचा आनंद घेतला. किमान पन्नास हजार पेक्षा जास्त भावीकांची यावेळी उपस्थीती होती. बारवेजवळ मिरवणूक आल्यानंतर देवीला अंबीलचा नैवेद्य दाखवण्यात आला या ठिकाणी या मिरवणूकीची सांगता करण्यात आली. त्यानंतर एस टी बस स्थानक परिसरातील मळगंगा चित्रमंदिर परिसरातील प्रांगणात ग्रामस्थ, मुंबईकर मंडळ व भावीक यांच्या लोकसहभागातून लाखो भावीकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित भावीकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
काठ्या, पालख्या मिरवणुकीला लाखो भावीकांची उपस्थीती
बुधवारी दि.१ मे रोजी रात्री नउ ते एक वाजेपर्यंत निघालेल्या काठ्या व पालख्यांच्या मिरवणुकीला लाखो भावीकांची उपस्थीती होती. यावेळी फटाक्यांची आतषबाजी तसेच भंडाऱ्याची उधळण करीत वाजत गाजत विविध गावच्या काठ्या व पालख्या मिरवणूकीत सहभागी झाल्या होत्या. राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचे मुख्य स्थान निघोज व कुंड असले तरी देवीच्या सात बहीणींची स्थाने बेलापूर भिंगार,उंब्रज, चिंचोली, नेवासा, आदी तसेच पुणे व नगर जिल्ह्यातील बहुसंख्य गावात मळगंगा मंदीरे असून निघोज येथील यात्रेसाठी जवळपास पंधरा ते सोळा गावच्या काठ्या व पालख्या या ठिकाणी येत असतात गावकरी व भावीक प्रत्येक गावच्या मानकऱ्यांचा सन्मान करुण काठ्या व पालख्या यांना मिरवणूकीत अग्रभागी स्थान देऊन सन्मानित करतात. गावची काठी ८५ फूट उंचीची असून ही काठी सजवून यावेळी मुख्य पेठेतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भोवताली असणाऱ्या विविध गावच्या काठ्यांनी फेर धरून तसेच पालख्यांच्या मिरवणुकीला शोभा आली होती ग्रामपंचायत चौक ते श्रीराम मंदिर तसेच पुन्हा मळगंगा मंदीर अशा या सवाद्य मिरवणूकीला तब्बल सहा तास लागले मात्र ही मिरवणूक लक्षवेधी ठरली आहे. मळगंगा देवीच्या जयजयकाराच्या घोषना देत भावीकांनी मोठ्या भक्तिभावाने या मिरवणुकीत सहभागी होऊन मिरवणुकीची शोभा वाढवली.