मुंबई । नगर सहयाद्री-
सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर रविवारी (१४ एप्रिल रोजी) गोळीबार झाला. ही घटना घडली तेव्हा सलमानसह इतर सर्वजण घरातच होते, पण कोणीही जखमी झालेलं नाही. सलमानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली असून पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी तपास करत आहेत.
सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर सिनेसृष्टीतही खळबळ उडाली आहे. अभिनेत्याच्या घरावर गोळ्या झाडल्याची जबाबदारी तुरुंगात बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोईने घेतली आहे. त्याची एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने हल्ल्याची जबाबदारी घेत हा फक्त ट्रेलर होता असं म्हटलंय आहे.
सलमानच्या घरावर फायरिंग करणारा कोण?
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात सहभागी असलेला विशाल राहुल उर्फ कालू हा गुरुग्रामचा रहिवासी आहे. त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले असून त्याच्यावर 5पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये गोळीबार आणि दुचाकी चोरीसारख्या गुन्ह्यांचाही समावेश आहे.
विशालवर गुरुग्राम तसेच दिल्लीतही अनेक गुन्हे दाखल आहेत. अलीकडेच लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून विशालने हरियाणातील रोहतक येथे एका बुकीची हत्या केली होती. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या घटनेत तो गोळीबार करताना दिसत आहे. विशाल हा राजस्थानचा कुख्यात गँगस्टर रोहित गोदाराचा शूटर आहे. रोहित गोदरा हा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहे.