अहमदनगर | नगर सह्याद्री
भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी काल महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना आव्हान दिले होते आणि तुम्ही मला ही भाषा बोलून दाखवा मी निवडणूक लढवणार नाही’ असे जाहीर वक्तव्य केले होते. त्यावर आमदार रोहित पवार यांनी विखेंच्या या वक्तव्याला जोरदारपणे उत्तर दिले आहे. तुमच्या सर्वोच्च नेत्याला हा प्रश्न करू नका नाहीतर तुमचे बारा वाजतील, असा सूचक इशारा सुद्धा त्यांनी मोदींचे नाव न घेता दिला आहे.
भाषा किंवा शिक्षण यावरून कर्तृत्व सिद्ध होत नाही. टीका करायला विषय नाही म्हणून विद्यमान खासदारांनी टीका केली आहे, असा टोलाही रोहित पवार यांनी यावेळी लगावला आहे. आमदार रोहित पवार यांनी एक्स वर सुजय विखे यांचा व्हिडीओ ट्विट करत त्यावर एक पोस्ट लिहिली आहे.
या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, लोकप्रतिनिधीला इंग्रजी-हिंदी समजते की नाही हे महत्वाचे नसते तर लोकप्रतिनिधीला जनतेची भाषा, त्यांच्या अडचणींची भाषा समजली पाहिजे आणि जनतेची भाषा समजण्यात आम्ही दिलेले उमेदवार माहीर आहेत.
नाहीतर इंग्रजी-हिंदी येऊनही संसदेत गप्प बसणार्या भाजप खासदारांची, प्रश्नांची उत्तरं न देता येणार्या मंत्र्यांची संख्या काही कमी नाही. असो! भाषा किंवा शिक्षण यावरुन कर्तृत्व सिद्ध होत नाही. टीका करायला विषय नाही म्हणून विद्यमान खासदारांनी ही टीका केली असेल हे आम्ही समजू शकतो. पण याच अविर्भावात तुमच्या सर्वोच्च’ नेत्याला हा प्रश्न करू नका, नाहीतर तुमचेच बारा वाजतील! असे म्हटले आहे.