नाशिक / नगर सह्याद्री : नाशिक लोकसभा मतदारसंघामधील जागावाटपावरून महायुतीमध्ये बरीच खडाजंगी सुरु असल्याचे दिसते. साताऱ्याच्या बदल्यात राष्ट्रवादीने नाशिकची जागा मागितली आहे. त्यामुळे तेथे मंत्री छगन भुजबळ यांची उमेदवारी असेल म्हटले जाते. परंतु त्यामुळे आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून आणि दूरध्वनीवरुन नाशिकची जागा गेल्यास शिंदे गटाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होऊ शकतो? अशी तक्रार केली आहे.
आज दुपारी नाशिक शहरात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या कार्यालयात स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघ कोणाचा याबाबत चर्चा करण्यात आली. नाशिकचे विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचा आहे. त्यांनी युतीचा धर्म पाळून भाजपला पाठिंबा दिला आहे. शिंदे गटाने आजवर सातत्याने युतीचा धर्म पाळला आहे. त्यामुळे अन्य घटक पक्षांनी शिंदे गटाला टार्गेट करणे चुकीचे आहे. कोणत्याही स्थितीत नाशिक मतदारसंघ शिंदे गटालाच राहिला पाहिजे, अशी भूमिका आणि संतप्त भावना विविध पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडल्या.