मुंबई। नगरबी सह्याद्री
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात भाजपाने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही युतीत सहभागी होण्याची चर्चा सुरू झाली असून मुंबईतील १ जागा महायुती मनसेला सोडणार असल्याची चर्चा आहे.
मुंबईतल्या ६ जागांपैकी ५ जागांवर भाजपा तर एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार लढणार आहे. मात्र भाजपा आपल्या कोट्यातील १ जागा मनसेला सोडणार असल्याची शयता वर्तवली जात आहे. दक्षिण मुंबई ज्याठिकाणी सध्या अरविंद सावंत हे ठाकरे गटाचे खासदार आहेत. ती जागा भाजपा मनसेला सोडण्याची शयता आहे. याबाबत लवकरच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईची जागा मनसेला दिली जाणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे लोकसभा मतदारसंघनिहाय दौरा करत शाखांना भेटी देत आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची चर्चा करत आहे. त्यात राज ठाकरे यांनी पदाधिकार्यांना तुम्ही लोकांपर्यंत पोहचा, संपर्क वाढवा, लोकसभा निवडणुकीबाबत येत्या ३-४ दिवसांत मी भूमिका स्पष्ट करतो असं सांगितले होते. त्यानंतर आता ही बातमी समोर येत आहे. दक्षिण मुंबई याठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठीबहुल भाग आहे. याठिकाणी मनसेचे वजनही तितकेच जास्त आहे.