श्रीगोंदे / नगर सहयाद्री :
श्रीगोंदे तालुक्यातील युवकांच्या हत्येने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. रात्री पाच लोकांनी घरात घुसत तरुणाची कोयत्याने हत्या केली होती. आता या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
प्रियकरासह ६ आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातून जेरबंद केले आहे.
पोलिसांनी आरती योगेश शेळके (वय २६), रोहीत साहेबराव लाटे (वय २३) दोन्ही रा. कोथुळ, ता. श्रीगोंदा, शोएब महमंद बादशाह, (वय २२ रा. सेक्टर डी लाईन, ट्रॉम्बे, मुंबई), विराज सतीश गाडे (वय १९ रा. पुणे), आयुष शंभू सिंह (वय १८), पृथ्वीराज अनिल साळवे (वय १९), अनिश सुरेंद्र धडे (वय १९) तिन्ही रा. घोरपडे पेठ, पुणे याना पोलिसांनी जेरबंद करत बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
अधिक माहिती अशी : फिर्यादी आरती योगेश शेळके यांनी फिर्याद दिली होती की, ३० जानेवारी रोजी 4 इसमांनी घरात घुसत मध्यरात्री योगेश सुभाष शेळके हे झोपलेले असताना त्यांच्यावर वार करत त्याला ठार केले होते. या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 37/2024 भादविक 302, 452, 506, 34 आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना याबाबत तपासाचे आदेश दिले होते.
त्यांनी एक पथक तयार करून तपास सुरु केला. एकंदरीत घटनाक्रम पाहता, फिर्यादीवरच पथकाचा संशय बळावला होता. त्यांनी तांत्रिक गोष्टींचा उलगडा करत असताना मयताचा भाचा शुभम लगड याचे मोबाईलवर रोहीत साहेबराव लाटे याचा घटनेच्या दिवशी सकाळी कॉल आलेला दिसला. पथकाने पुणे येथे जाऊन रोहीत लाटे याला विश्वासात घेत विचारपूस केली. त्यावेळी त्याने मयताची पत्नी आरती व त्याचे प्रेमसंबंध होते. त्यावरुन मयत योगेश हा त्यांच्या अनैतिक संबंधाचे संशयावरुन आरतीस नेहमी दारु पिऊन शिवीगाळ व मारहाण करत असल्याने खुनाचा कट रचला. त्यास ठार केले असल्याचे सांगितले.