लोणावळा / नगर सह्याद्री : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलक मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. या पदयात्रेस पुण्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
सध्या आंदोलक नवी मुंबईच्या दिशेने निघाले असून सध्या ते लोणावळ्यात आहेत. उद्या ते मुंबईत धडकणार असून त्यांच्या आंदोलनाला सुरूवात होणार आहे. परंतु हे मुंबईत जाण्यापूर्वीच त्यांना रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारचं एक शिष्टमंडळ मनोज जरांगेशी चर्चा करण्यासाठी तेथे पोहोचलं असून त्यांची चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील जरांगे यांच्याशी वेळ पडलीच तर ऑनलाइन संवाद साधण्याची शक्यता आहे.
सरकारचं शिष्टमंडळ भेटीला
गेल्या तासाभरापासून संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांची मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांच्याकडून मनोज जरांगे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारीही आहेत. मनोज जरांगे यांचा मोर्चा अजूनतरी लोणावळ्यातच मुक्कामस्थळी आहे. आज जरांगे पाटील यांचा मोर्चा नवी मुंबईत धडकणार होता, मात्र अजूनही त्यांचा लोणावळ्यातच मुक्काम आहे. तेथेच प्रशासनाकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
त्यामुळे आता सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात यशस्वी ठरेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जर हा प्रयत्न यशस्वी झाला नाही तर हे शिष्ट मंडळ मनोज जरांगे यांचा आणि सध्या दरे गावात असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट व्हीसीद्वारे संवाद साधून देतील. आता मनोज जरांगे पाटील मुंबईत येतील की थांबतील याचीही सर्वांनाच उत्सुकता आहे.