मुंबई / नगर सह्याद्री : मागील काही दिवसांपासून राज्यभरात तलाठी भरती घोटाळा गाजत आहे. आता या मुद्द्यांवरून वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस पक्ष आता आक्रमक झाला असून आंदोलकांनी दादर स्थानकात गोंधळ घालत लोकल अडवण्याचा प्रयत्न केला आहे.
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला. तलाठी भरती घोटाळ्याची एसआयटी चौकशी करून घोटाळ्यामागील मास्टरमाईंड शोधा, अशी प्रमुख मागणी करत कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी रूळांवर मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उतरल्याने पश्चिम रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. संध्याकाळच्या सुमारास कार्यालयातून घरी जाणाऱ्या मुंबईकरांना या आंदोलनाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
या आंदोलनामुळे साधारण पुढील ४० ते ५० मिनिटे रेल्वे वाहतुकीचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. राज्यात तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाला आहे. त्याचे पुरावे आमच्याकडे मागितले जात आहेत. एवढंच नाही तर आम्ही पुरावे दिल्यानंतरही कारवाई केली जात नाही. त्यामुळे आम्हाला रेल्वे रोको करून सरकारचं लक्ष वेधून घ्यावं लागल्याचे कुणाल राऊत यांनी सांगितले.