मुंबई। नगर सहयाद्री
येत्या पंधरा ते वीस दिवसांत मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. महाजन यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
निवडणुकीच्या आधी राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. कुठल्या पक्षात काय होईल, ते कळेलच. पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये हा राजकीय भूकंप होईल. भाजपमध्ये येण्यासाठी अनेक पक्षातले अनेक नेते इच्छूक आहेत, असे मंत्री महाजन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाजन यांच्या वक्तव्यावर उबाठा नेते खा. संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, भूकंप व्हायला हा महाराष्ट्र आहे, जपान नाही. जेव्हा २०२४ मध्ये खर्या अर्थाने भूकंप येईल, तेव्हा हे सगळे वाहून जातील. ईडीच्या भीतीने पक्ष फोडणे याला भूकंप म्हणत नाहीत.
विरोधकांवर धाडी घालणे, त्यांना तुरुंगात पाठवणे याला भूकंप नाही तर डरपोकपणा म्हणतात. दरम्यान, २०१९ मध्ये ज्या पद्धतीने भाजपकडे मेगाभरती झाली होती; तशीच भरती आता २०२४ च्या निवडणुकीपूर्वी होईल, असे सांगितले जात आहे. या संदर्भात भाजप नेते वारंवार बोलत आहेत. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये फूट पडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.