पारनेर। नगर सहयाद्री
टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील दुर्गम भागातील आदिवासी व गरजू मुलींना शैक्षणिक सुविधेसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ७५ सायकलींना मंजुरी मिळाली असल्याची माहिती माजी सभापती काशिनाथ दाते यांनी दिली.
अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत ५ वी ते १० वी मध्ये शिकणार्या मागासवर्गीय विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी लेडीज सायकल खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. या आर्थिक वर्षात ही योजना आल्यानंतर टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील श्री हरेश्वर शिक्षण संस्थेचे कर्जुले हर्या, खडकवाडी, पळशी येथील शिक्षकांना मुलींना मिळणार्या सायकलीसाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. तसेच गुरेवाडी येथील शामजी बाबा विद्यालय येथील आदिवासी, मागासवर्गीय मुलींनाही प्रस्ताव दाखल करण्यास सांगितले होते. त्यानुसार आलेल्या पात्र सर्वच ७५ प्रस्तावांना मंजुरी झाली असून लवकरच या विद्यार्थिनींना सायकल वाटप करणार असल्याची माहिती दाते यांनी दिली.
श्री मलवीर विद्यालय पळशी येथील विद्यार्थिनींना २७ सायकल, नूतन माध्यमिक विद्यालय खडकवाडी ११ सायकल, शामजी बाबा विद्यालय गुरेवाडी येथील १५ सायकल अशा ५३ सायकली मागासवर्गीय विद्यार्थ्यांनीना मंजूर झाल्या. कर्जुले हर्या येथील श्री हरेश्वर विद्यालयास १७ सायकल, समर्थ विद्यालय पोखरी ५ सायकल अशा २२ सायकल महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत मंजूर झाले आहेत. मागील सहा वर्षात ६०० सायकलचे वाटप करण्यात आले आहे.
मागील सहा वर्षात दिव्यांगाना लघु उद्योगासाठी अर्थसहाय्य, पिठाची गिरणी, अतितीव्र दिव्यांगास औषधोपचारासाठी अर्थसहाय्य, कडबा कुट्टी, शिलाई मशीन, मिरची कांडप मशीन, झेरॉस मशीन, इलेट्रिक मोटर, जिल्हा परिषद अंतर्गत दूर्घर आजारासाठी दिले जाणारे अर्थसहाय्य, अपंग व्यक्तीने अपंग व्यक्तीशी विवाह केल्यास अर्थसहाय्य, अतितीव्र बहुविकलांग अपंग पालकांच्या पाल्यांना अर्थसहाय्य, मतिमंदासाठी औषधोपचार अर्थसहाय्य, बॅटरी संचालित रिक्षा, अशा अनेक योजनांचा लाभ सर्वसामान्यांसाठी सभापती दाते यांनी करून दिला आहे,
दुःखाची झळ व वेदनांची कळ जाणणारे व्यक्ती म्हणजे काशिनाथ दाते
आजवर अनेक गरजू विद्यार्थीनींना मोफत सायकलींचा लाभ झालेला आहे. दुःखाची झळ आणि वेदनांची कळ जाणणारे व्यक्ती म्हणजे काशिनाथ दाते आहेत. त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे.
– रामदास शिंदे, अध्यक्ष, श्री हरेश्वर शिक्षण संस्था कर्जुले हर्या
सर्व शिक्षकांचे आभार
मला ३ किलोमीटर अंतरावरून शाळेत यावे लागते, यासाठी पाऊण तास लागतो, काशिनाथ दाते यांच्या माध्यमातून मुलींना सायकल मिळाल्या. सायकल मिळण्यात पंढरीनाथ उंडे यांचे विशेष योगदान आहे. तसेच शाळेतील सर्व शिक्षक, संतोष कोकाटे यांचेही आभार मानते
-वेदिका आंधळे, इ. ९ वी, कर्जुले हर्या