अहमदनगर। नगर सहयाद्री
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महापालिकेच्या वतीने नगर शहरात आयुष्यमान आरोग्य मंदिर या नावाने १८ आरोग्यवर्धिनी केंद्र करण्यात येत आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणार्या या आरोग्य केंद्राद्वारे नागरिकांना मोफत तपासणी, उपचार व औषधे दिली जाणार आहेत. काही प्राथमिक रक्त तपासण्याही मोफत केल्या जाणार आहेत. येत्या आठवडाभरात यातील ९ अखेरपर्यंत ही केंद्र कार्यरत करण्यात येणार आहेत.
सध्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयास महापालिकेकडून सात आरोग्य केंद्रावर सेवा दिली जात आहे. आता आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून आणखी १८ उपकेंद्रांवर सर्वसामान्य नागरिकांना मोफत आरोग्य सेवा सुरू होणार आहे. प्रशासनाने ९ केंद्रांची उभारणी पूर्ण केली आहे. सुमारे १५ ते २० हजार लोकसंख्येमागे एक यानुसार शहरात झोपडपट्टी, चाळ, गरीब – सामान्य लोकवस्ती असलेल्या भागात सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. आरोग्य तपासणी व उपचार यासह राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमही या केंद्रांवर राबविण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यात नऊ केंद्रे सुरू होणार
१) काटवन खंडोबा, २) सिद्धार्थनगर, ३) नालेगाव – वारुळाचा मारुती परिसर, ४) शास्त्रीनगर, केडगाव, ५) इंदिरानगर, केडगाव, ६) चिपाडे मळा – सारसनगर, ७) तपोवन रोड, ८) शिवाजीनगर, कल्याण रोड, ९) बोल्हेगाव गावठाण