अहमदनगर / नगर सह्याद्री
पारस कंपनीचे पीव्हीसी पाईप ऑर्डर असलेल्या ठिकाणी न पाठविता ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची 11 लाख दोन हजार 145 रूपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. दत्तात्रय जयसिंग जाधव (वय 45 रा. सारोळा कासार, ता. नगर) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
या प्रकरणी त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी (10 सप्टेंबर) दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम कुमार (पूर्ण नाव पत्ता नाही), इरफान नुर मोहद (रा. नुह, हाइ विद्यालय जवळ, फेरोजपुर नमक, मेवात, हरीयाणा) व आयशर ट्रक चालक शाद जफरू मोहद (रा. वील मुराद, मेवात, हरीयाणा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सदरची घटना 3 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान घडली आहे. जाधव यांचे केडगाव बायपास चौक येथे श्री सावता ट्रान्सपोर्टचे कार्यालय आहे.
त्यांना 10 लाख दोन हजार 145 रूपये किमतीचे पारस कंपनीचे पीव्हीसी पाईप आणि फिटींगचा माल ऑर्डर प्रमाणे हरीयाणा येथे पोहोच करायचा होता. त्यांच्याकडे ट्रक उपलब्ध नसल्याने त्यांनी ट्रान्सपोर्ट पोर्टल अॅपवर ऑर्डर टाकली. तेव्हा त्यांना गौतम कुमार याने फोन करून विश्वासात घेतले व सदरचा माल दिलेल्या पत्त्यावर पोहचविण्यासाठी एक लाख रूपये भाडे ठरवून ट्रक पाठविला. जाधव यांनी 50 हजार रूपये गौतम कुमार यांना नेट बँकिंगव्दारे दिले. तसेच इरफान नुर मोहद याला 25 हजार व नंतर 25 हजार असे फोन पे व्दारे दिले. जाधव यांनी त्या ट्रक मध्ये ऑर्डर प्रमाणे भरून दिलेला 10 लाख दोन हजार 145 रूपये किमतीचा माल संशयित तिघा आरोपींनी हरीयाणा येथे पोहोच न करता जाधव यांचा विश्वासघात करून गायब करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे करत आहेत.