पारनेर । नगर सहयाद्री:-
पारेनर तालुका दूध संघाच्या निवडणुकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा पॅनलने खासदार नीलेश लंके यांच्या सहकार पॅनलवर दणदणीत विजय मिळविला. 15 पैकी 12 जागा जिंकत जनसेवा पॅनलने आपले वर्चस्व सिद्ध केले. गुरुवार 28 ऑगस्ट रोजी सुपा येथील दूध संघ कार्यालयात अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडी होणार आहेत. त्यामुळे पारनेर दूध संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पै. युवराज पठारे, दत्तानाना पवार, दादाभाऊ वारे यांची नावे चर्चेत आहेत.
पारनेर तालुका दूध संघाच्या निवडणुकीत माजी खासदार सुजय विखे यांनी पडद्याआडून सूत्र हलवत आमदार काशिनाथ दाते आणि भाजप तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक जिंकली. दूध संघाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे राहुल पाटील शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे डॉ. सुजय विखे, आ. काशिनाथ दाते आणि तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या व्यक्तींना दूध संघाच्या कामाची जबाबदारी मिळणार, हे गुरुवारी स्पष्ट होईल. दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नगरसेवक पै. युवराज पठारे, सुपा गावचे माजी उपसरपंच दत्ता नाना पवार, ज्येष्ठ नेते दादाभाऊ वारे यांची नावे चर्चेत आहेत. तर उपाध्यक्ष पदाच्या शर्यतीत संदीप ठुबे, भीमराव शिंदे, कल्याण काळे यांची नावे चर्चेत आहेत. तरीही यापैकी नवख्या चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते का हे पाहणे औचुक्याचे ठरणार आहे.
या निवडणुकीत जनसेवा पॅनलने सहकार पॅनलचा पराभव करत आपली ताकद दाखवली. स्थानिक राजकारणातही या विजयाने खळबळ उडाली आहे. दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी आणि सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी जनसेवा पॅनल प्रयत्नशील राहणार असल्याचे दाते यांनी नमूद केले. गुरुवारी होणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे पारनेर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दूध संघाच्या निवडणुकीत झेडपीची रंगीत तालीम
आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. दूध संघाच्या निवडणुकीत माजी खासदार सुजय विखे यांच्या गटाने दणदणीत दूध संघावर विजय मिळविल्याने खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद व पंचायत समितीची रंगीत तालीम दूध संघाच्या निवडणुकीत पहावयास मिळाली. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये पारनेरमध्ये लंके विरुद्ध विखे असाच सामना पहावयास मिळणार आहे.