अहिल्यानगर | नगर सह्याद्री
हिवरेबाजार येथे गुरुवार 05 जून 2025 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने ‘एक वृक्ष आईसाठी, एक वृक्ष देशासाठी’ मातृस्मृती वनमंदिर येथे संत श्री ज्ञानेश्वर माउली यांच्या 725 वा संजीवन समाधी सोहळा, जगदगुरु संत श्री तुकोबारायांचा 375 वा वैकुंठगमन सोहळा, पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती यांचे औचित्य साधून एकूण 1400 देशी वृक्षांची लागवड करण्याचा शुभारंभ अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते करण्यात आला. 05 जून ते 05 जुलै या कालावधीत विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
हिवरेबाजार येथे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली सन 1989 पासून 10 लाख वृक्षांची लागवड करून संवर्धन करण्यात आले असून आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केलेली वृक्षलागवड हे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने दीपस्तंभासारखे आहे असे उदगार जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी काढले. आनंद भंडारी म्हणाले जागतिक तापमानवाढीची समस्या संपूर्ण जगाला भेडसावत असून परिणामी हिमशिखरे वितळून समुद्राकाठची शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यता पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. विकासकामातील सातत्यामुळे हिवरे बाजार हे विकासकामांची ग्रामपंढरी आहे. माझ्या 22 वर्षाच्या प्रशासकीय सेवेमध्ये हिवरे बाजारने ग्रामविकासाला दिशा दिलेली आहे.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा फेटा बांधून व ‘बुद्धायन’ हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. अहिल्यानगर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाबूराव जाधव यांची बदली झाल्याबद्दल तसेच संजय पवार यांचा सेवानिवृत्तीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, केंद्रप्रमुख अंबादास गारुडकर, सरपंच विमलताई ठाणगे, चेअरमन छबूराव ठाणगे, व्हाइस चेअरमन रामभाऊ चत्तर, दूध संस्था चेअरमन बाबासाहेब गुंजाळ, हरिभाऊ ठाणगे, एस. टी. पादीर, रो.ना. पादीर, मुख्याध्यापक बाबासाहेब जाधव मुख्याध्यापक मुरलीधर अमृते यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.