अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
जुने वैर आणि शाब्दिक वादातून नगरातील झेंडीगेट परिसरात तरुणावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना घडली. फैजान निसार जहागीरदार (वय २५, रा. वेल. जी. हाईटस, हनुमान मंदिर शेजारी) याच्यावर सात जणांच्या टोळयाने तलवार आणि रॉडने हल्ला करून १५ हजार रुपये लुटले. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फैजान हा रात्रीच्या सुमारास पिंजरा गोश मार्केटजवळून जात असताना नसीर शेख अब्दुल्ला ऊर्फ तुको, फर्मान शेख नसीर ऊर्फ लुक्का, अशान शेख नसीर, मुशाहिद शेख लियाकत, अकिल शेख लियाकत ऊर्फ घंटा, सर्फराज शौकत शेख ऊर्फ कलेजी आणि सलमान शेख आसिफ ऊर्फ दंगल यांनी त्याला अडवले. तु इथून का जातोस? असा जाब विचारत त्यांनी फैजानला शिवीगाळ केली. यापूर्वीच्या वादाच्या रागातून सर्फराज आणि मुशाहिद यांनी तलवारीने फैजानच्या उजव्या हाताच्या दंडावर आणि खांद्याखाली वार केले.
फर्मानने रॉडने मारहाण केली, तर मुशाहिदने फैजानच्या खिशातील १५ हजार रुपये हिसकावले. इतर आरोपींनीही लाथा-बुक्क्यांनी फैजानला बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेत फैजानला सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.