अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
किरकोळ कारणातून गुणवडी (ता. अहिल्यानगर) गावात तरूणावर दोघांनी लोखंडी गज व दगडाने हल्ला केल्याची घटना रविवारी (11 मे) रात्री 9:30 वाजेच्या सुमारास घडली. योगेश बापुसाहेब परभणे (वय 27, रा. गुणवडी) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजु काका लांडगे, अनिकेत विजु लांडगे (रा. गुणवडी, ता. अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी योगेश परभणे हे आपल्या शेतात कांदा वखारीत काम करणार्या मजुरांसाठी घरून जेवणाचे डबे घेऊन जात असताना, गावातील चौकात विजु लांडगे व अनिकेत लांडगे हे उभे होते. त्या ठिकाणी रस्ता मागताच संशयित आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करत गचांडी धरली. त्यानंतर फिर्यादी तेथून निघून गेले.
मात्र, त्याच रात्री 9.30 वाजता पुन्हा चौकात संशयित आरोपी अनिकेत लांडगे याने अचानक येऊन फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी गजाने मारहाण केली. त्याचवेळी विजु लांडगे याने दगडाने मारहाण केली. या हल्ल्यात योगेश यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊन ते बेशुध्द झाले. त्यांना तत्काळ खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पोलिसांनी योगेश परभणे यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस अंमलदार आर. व्ही. गांगर्डे करीत आहेत.