वाहनांची तोडफोड | आठ जणांविरुद्ध गुन्हा
अहिल्यानगर । नगर सहयाद्री:
शहरातील जुने कोर्ट जवळ एका युवकावर मध्यरात्री कोयत्याने हल्ला करून गंभीर दुखापत करण्यात आली. तसेच त्याच्या घराबाहेर उभ्या चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. आरिफ गयासुद्दीन शेख (वय 24) असे जखमी युवकाचे नाव आहे.
त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून उपचारादरम्यान त्याने दिलेल्या जबाबावरून आठ जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर साठे, अनिकेत साळुंके, आदर्श साळुंके, राहुल रोहकले, आयान शेख, जियान शेख, अब्दुल समद शेख, गणेश भुजबळ (सर्व रा. नालेगाव, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
आरिफ शेख हे बुधवारी रात्री आपल्या मित्रांसमवेत घराबाहेर गप्पा मारत होते. यावेळी तीन ते चार दुचाकीवरून आलेल्या संशयित आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवला. मयूर साठे याच्या हातात कोयता होता, तर इतरांच्या हातात लाकडी दांडके होती. शिवीगाळ करत त्यांनी आरिफ यांना दमदाटी केली आणि त्यानंतर हल्ला केला. मयूर साठे याने कोयत्याने आरिफ यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याजवळ तसेच तळहातावर वार केले. आदर्श साळुंके याने डाव्या पायाच्या नडगीवर वार केला.
हल्लेखोरांनी आरिफ यांच्या मित्राच्या कार (एमएच 12 क्यूटी 8574) आणि कार (एमएच 16 सीवाय 8910) या वाहनांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. या हल्ल्यात आरिफ यांच्यासोबत असलेल्या मुस्ताफा रईस सय्यद यांच्या नाकाजवळ दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच आरिफ यांचे बंधू नदीम यांनी तात्काळ डायल 112 वर संपर्क साधला. पोलिसांच्या येण्याची चाहूल लागताच हल्लेखोरांनी पळ काढला. पोलीस पुढील तपास करत आहेत.