Maharashtra Crime News: आजही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला जात आहे. यातून फसवणूक झाल्याचे देखील समोर आले आहे. असाच प्रकार लातूरच्या उदगीरमध्ये समोर आला असून घरावर काळी जादू, भानामतीचे सावट आहे. हे दूर करण्यासाठी अघोरी प्रयोग करत ३३ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात दोन महिला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील जळकोट रोडवरील एकाच्या घरामध्ये करणी, भानामती आणि काळ्या जादूचे संकट पसरले आहे. यासाठी काही पूजा विधी करून काळी जादू घालवावी लागेल असे सांगण्यात आले. त्यानुसार कासीमपुरा येथील फिर्यादीच्या घरी ७ सप्टेंबर २०२२ ते ३० डिसेंबर २०२४ पर्यंत संबंधितांनी संगनमत करून तुमच्या घरावर काळी जादू, करणी केल्यामुळे तुमच्या कुटुंबावर संकट असल्याची भीती दाखविली.
कुटुंबावरील संकट आम्ही दूर करतो, म्हणून कुटुंबात भीती निर्माण करून घरातील अंगणात जादूटोणा विधी करून काहीतरी वस्तू पुरल्या. यासाठी रक्कमेची मागणी करण्यात आली होती. दरम्यान संबंधितांनी वेळोवेळी फिर्यादी व फिर्यादीच्या मुलीचे, सुनेचे सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३३ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज घेऊन फसवणूक केली.
घरातील सोने- चांदी यासह ३३ लाखाचा गंडा घातला असल्याचे समोर आले. दरम्यान या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून पोलिसांनी तपास करण्यास सुरवात केली असता या प्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेतल आहे. पुढील चौकशी पोलिसांकडून सुरु आहे.