spot_img
अहमदनगरतुम्हीही लेकरूच होता, तुमचेही बालहट्ट पुरवलेत! कर्तृत्व सिद्ध केले तसे तेही करतीलच...

तुम्हीही लेकरूच होता, तुमचेही बालहट्ट पुरवलेत! कर्तृत्व सिद्ध केले तसे तेही करतीलच ना! जनतेला ठरवू द्या!

spot_img

तुम्ही विसरला असाल! संगमनेर-शिर्डीकर नाही विसरले | कर्तृत्व सिद्ध केले तसे तेही करतीलच ना! जनतेला ठरवू द्या!

मोरया रे | शिवाजी शिर्के

बाप्पाच्या आगमनाला अद्याप बर्‍यापैकी अवधी! तरीही बाप्पा माझ्या कार्यालयात सकाळीच पाहून मी आश्चर्यचकित झालो.

मी – बाप्पा! अरे इतक्या लवकर? तुझ्या आगमनाची अद्याप चाहूलही लागलेली नाही. त्यातही आज अमावास्या! अमावास्येच्या दिवशी तू असा अचानक कसा?
श्रीगणेशा – अमावास्या…. (असं बोलत बाप्पा, माझ्याकडून पाहत कुत्सितपणे हसला!)

मी – बाप्पा, अरे आज गटारी अमावास्या आहे ना! (खरेतर मला आषाढी अमावास्या असं म्हणायचं होतं.)

श्रीगणेशा – होय रे, तुमच्यासाठी गटारीच अमावास्या! आषाढसरीत सारे न्हाऊन निघत असताना तुमच्या नगर जिल्ह्यात लेकराच्या मुद्द्यावर रान पेटलेले पाहून मला अमावास्येच्या निमित्ताने तुम्हा नगरकरांना खरी झिंग चढण्याआधी वास्तव सांगण्याची आवश्यकता भासली! म्हणून मी आलो.
(आमच्यात संभाषण चालू असतानाच माझा मोबाईल खणखणला! मित्राचा फोन होता आणि तो मी टाळू शकत नव्हतो. कारण, मित्रांसोबत शनिवार- रविवार असं दोन दिवसांचं पार्टी सेलिब्रेशन ठरलं होतं! निघण्याची वेळ झाली होती आणि सारे मित्र कार्यालयाच्या खाली वाहनात बसून माझी वाट पाहत होते.)

मी – (फोन उचलला) अरे थांबा थोडं! अचानक बाप्पा आलेत आणि महत्त्वाचं बोलत आहेत. (‘उशीर होतोय’, असा आवाज तिकडून कानावर आला. मात्र, तोपर्यंत मी फोन कट केला होता.)

श्रीगणेशा – अरे पंढरीची वारी करून आलास ना! गळ्यात तुळशीची माळ अन् मग कशाला ही असली गटारी अमावास्येची थेरं!

मी – बाप्पा, मित्रांचा आग्रह आहे रे! ते जाऊ दे! लेकराच्या मुद्द्यावर तू काहीतरी बोलत होतास?

श्रीगणेशा – अरे दोन दिवस झाले लेकराचा हट्ट हा विषय चालू आहे. पद्मभूषण राहिलेल्या बाळासाहेबांच्या नातवाने नेहमीप्रमाणे वादाला तोंड फोडले. लोकसभेला पराभूत झाल्यानंतर विखे पाटलांचा हा नातू शांत बसेल असं अनेकांना वाटत होते. मात्र, त्या पोरानं गुगली टाकली आणि राहुरीत वादळ निर्माण होण्याच्या आधी संगमनेरमधून प्रतिक्रिया आली. बुर्‍हाणनगरचे शिवाजीराव अस्वस्थ होतील असं वाटलं होतं. पण, त्यांनी पहिल्या झटक्यात या नातवाला शुभेच्छा दिल्या आणि या विषयाला बगल मारली. खराखुरा पहिलवान गडी शोभला बरं हा! पहिलवानाची ही प्रतिक्रिया बाहेर येत नाही तोच नातवाकडूनही हा पहिलवान विधानसभेत पाठविण्यासाठी बाजी लावणार असा खुलासा आला. हे सारं काही चालू असतानाच तिकडे आश्वीत सहकारमहर्षी भाऊसाहेबांच्या मुलाने म्हणजेच बाळासाहेब थोरातांनी, ‘ते मोठ्याचे लाडकं लेकरू आहे. त्याचा छंदच असेल, तर तो पुरवला पाहिजे. पक्षाने नाही, तर तो पालकाने पुरवला पाहिजे. यामुळे बालकाचा छंद तर पुरा होईल, असे म्हणत या नातवाची खिल्ली उडवली.

मी – बाप्पा, त्यात गैर काय आहे! ते दोघे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. एकमेकांच्या विरोधात बोलणारच!

श्रीगणेशा – होय रे बाबा, ते फक्त राजकीय विरोधक नाहीत तर पक्के हाडवैरी आहेत हे सार्‍यांनाच माहितीय! पण, भाऊसाहेबांच्या या मुलाचे खिल्ली उडवणारे वक्तव्य समोर येताच पद्मभूषण राहिलेल्या बाळासाहेबांचे चिरंजीव राधाकृष्ण यांनी, ‘आमच्या मुलाचा छंद जोपासायला आम्ही सक्षम आहोत. याबाबत आम्हाला शिकविण्याची गरज नाही. तुमच्या घरातील मुलामुलींचा छंद पुरविलेला चालतो. दुसर्‍याच्या मुलाची काळजी का करता असा मिष्कील टोला लगावलाय!

मी – त्यांचेही उत्तर योग्यच वाटते! बाप्पा, अरे हे दोघेही राज्यातील दिग्गज नेते आहेत. काँग्रेसमध्ये दोघेही होते! तरीही दोघांच्यातून विस्तव जात नव्हता. आता तर दोघांचे राजकीय पक्ष वेेगवेगळे झालेत! दोघांचीही नावे अनेकदा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आलीय! मागील सरकारमध्ये बाळासाहेब थोरात महसूलमंत्री होते आणि आताच्या सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील त्याच खात्याचे मंत्री! दोघांनीही आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे!

श्रीगणेशा – दोघांचीही वकिली करू नकोस! दोघांच्याहीबद्दल मला सारे काही अवगत आहे. ज्या मुद्द्यावर या दोघांच्यात शाब्दिक युद्ध पेटलंय, त्याच्याबद्दल बोल ना! अरे बाबा, आपल्या पाल्याचा हट्ट जोपासण्यास प्रत्येक पालक सक्षम असतो आणि त्या दृष्टीनेच पालक हा पालकत्वाची भूमिका पार पाडत असतो. दोन दिवसांपासून मुलाचा छंद जोपासण्याच्या अनुषंगाने प्रसिद्धी माध्यमांमधून जे काही वाचले आणि ऐकले जात आहे, त्याद्वारे जनतेची करमणूकच झाली. खरेतर ज्या बालहट्टाबाबत थोरात आणि विखे हे दोघेही बोलत आहेत, त्या दोघांचाही हट्ट यापूर्वीच त्यांच्या वडिलांनी पूर्ण केलाय! त्यामुळेच हे दोघेही दिग्गज आज राज्याच्या राजकारणात आपले नाव थेट मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आणू शकले आहेत. या दोघांचेही कर्तृत्व दोघांनीही सिद्ध केले असले तरी या दोघांनाही वारसा आहे तो त्यांच्या वडिलांनी केलेल्या राजकीय- सामाजिक चळवळीचा! मुलाचा छंद जोपासा असा टोमणा मारणार्‍या बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय वाटचालीत संगमनेरमध्ये स्व. भाऊसाहेब थोरात यांचे काम नसते तर हेच बाळासाहेब आज कोठे असते? विखेंचा नातू आज काय बोलला याहीपेक्षा त्याच सुजय विखे यांचे पणजोबा – आजोबा यांचे योगदान राहिल्यानेच त्या नातवाचाही प्रवास चालू आहे. छंद जोपासण्यास सक्षम असल्याचा दावा राधाकृष्ण विखे पाटलांनी केला असला तरी त्यांच्या पाठीशी पुण्याई आहे ती पद्मश्री विठ्ठलराव आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांची! म्हणजेच थोरात अन् विखे पाटील या दोघा नेत्यांचे आज कितीही मोठे नाव असले, त्यांचे कितीही मोठे काम असले आणि त्यांच्या पाठीशी कितीही मोठ्या कार्यकर्त्यांचा संच असला तरी त्या सार्‍यांची पुण्याई त्यांच्या वाडवडिलांची! या दोघांचेही छंद भाऊसाहेबांनी जसे जोपासले तसेच ते बाळासाहेबांनीही जोपासले! आता हे दोघे छंद जोपासण्याची भाषा करत असतील तर या दोघांनीही मागे वळून पाहण्याची गरज आहे. तुम्ही सुद्धा लेकरूच होतात! तरीही भाऊसाहेब अन् बाळासाहेब या दोघांनी जनतेला साद घातली आणि या दोघांनाही संगमनेर – शिर्डीकरांनी स्वीकारले. दोघांनीही त्यांच्या कामातून जनतेच्या मनावर राज्य केले. आज हे दोघेही एकमेकांना ‘हुकूमशहा’ म्हणून खिजवत असले तरी जनतेच्या मनात दोघांच्याही बद्दल आदराची भावना आहेच!

मी – बाप्पा, तू म्हणतो ते सारे खरे असेल तर मग हे दोघे एकमेकांवर तुटून का पडतात?

श्रीगणेशा – काल काय खाल्ले हे पटकन सांगता येत नाही असे सारेच विसराळू झालेत! अरे याचे उत्तर या दोघांनीच दिलेय! ‘आम्ही भांडल्याने अनेकांचे प्रपंच चालू आहेत, काहींच्या चुली पेटतात, काहींचे दिवस निघतात’, असं त्यांच्या कुटुंबातील सदस्य खासगीत बोलतात. खरं सांगू का? या दोघांनीही भांडायचं, आपसात आरोप – प्रत्यारोप करायचं सोडलं तर अनेकांच्या पोटपाण्याचा प्रश्न निर्माण होईल! अनेकांच्या चुली विझतील!

मी – बाप्पा, हे वास्तव सत्य असेल तर हे या दोघांना का पटत नाही! हे दोघे तसा प्रयत्न का करत नाहीत?

श्रीगणेशा – याचंही उत्तर मी देईन. लोकसभा निवडणुकीत थोरातांनी टोकाची भूमिका घेतली अन् त्याचं उट्टं काढण्याच्या तयारीत विखे आहेत असंच वरकरणी तरी दिसून येत आहे. याशिवाय तिकडे शिर्डीत विरोधकांना फूस लावण्याचे काम थोरात करत असल्याचं मत विखे पाटलांचं झाल्याचं दिसतंय! त्यातूनच संगमनेरच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी नातू पुढे आल्याचं दिसत आहे. सुजय विखेंच्या उमेदवारीने थोरातांना संगमनेरमध्ये गुंतून पडावे लागण्याची शक्यता वाटते. राज्याचा नेता संगमनेरमध्येच ठाण मांडून बसला हा प्रचार विखेंनी मागील निवडणुकीत केला होताच! थोरात अन् विखे यांच्यात कोणत्याही क्षणी समेट होऊ शकतो! कारण कुठपर्यंत ताणायचं हे दोघांनाही चांगलचं कळतं! कळत फक्त जनतेला नाही! त्यांनी उगीचच लेकराच्या गोष्टीवर बैठकांचा सपाटा लावलाय! लेकरू, बालहट्ट या दोघांचेही जनतेने पूर्ण केलेत! आता हे दोघे वेगळे काही बोलत आहेत असे अजिबात नाही! या विषयावर सविस्तर बोलणार आहेच! तूर्तास माझी वेळ संपलीय! असं बोलून बाप्पा निघून गेला.

मी माझी वाट पाहत बसलेल्या मित्रांच्या गाडीत बसलो अन् माळशेजकडे रवाना झालो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हिरव्या गुलालाचा उन्माद पवारांना नडला! उशिरा ठरलेल्या उमेदवाऱ्या अन्‌‍ जिरवाजिरवीच्या सुपाऱ्याही

बाळासाहेब थोरातांसह नीलेश लंके यांच्या भूमिका महाविकास आघाडीत ठरल्या मारक | उशिरा ठरलेल्या उमेदवाऱ्या...

धक्कादायक! दोन बाळांचे मृतदेह बॅरेलमध्ये तरंगताना दिसले; कुठे घडली घटना?

Maharashtra Crime News: धक्कादायक घटनेनं तालुक्याच जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. एका घरात दोन...

मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे यांची माघार?; केंद्रात मंत्री होणार..

मुंबई । नगर सहयाद्री:- महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि...

शहरात हिट अँड रन प्रकरण! आ. संग्राम जगताप तात्काळ नगरला; मयत तरुणाच्या कटूंबाची घेतली भेट

आ. जगताप यांनी घेतली हिट अँड रन घटनेतील मयत तरुणाच्या कुटुंबियांचे भेट अहिल्यानगर । नगर...