नाशिक । नगर सहयाद्री
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चादरम्यान पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारवर टीका करत, शेजारील नेपाळचे उदाहरण देत सूचक सल्ला दिला. मात्र या वक्तव्यावरून राज्याचे मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे.
शरद पवार यांनी आपल्या भाषणात “देवाभाऊ, देशाच्या आजूबाजूला बघा काय घडत आहे. नेपाळमध्ये राज्यकर्ते गेले आणि त्या ठिकाणी एक भगिनी सत्तेत आली. या घटनेतून शहाणपण शिकण्याची गरज आहे. असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण तापले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना विखे पाटील म्हणाले, आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका. शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण नाकारण्याचं पाप केलं आहे. त्यांनी आता स्वतःहून निवृत्ती स्वीकारावी, तरच समाजात चांगला संदेश जाईल. लोकांनी त्यांना निवृत्त करण्यापूर्वी त्यांनी स्वतःहून हा निर्णय घ्यावा. असे ते म्हणाले.
वंजारी समाजाच्या एसटी प्रवर्गातील समावेशाबाबत विचारले असता विखे पाटील म्हणाले, प्रत्येकाला आपली न्याय्य मागणी करण्याचा अधिकार आहे. घटनेने तो हक्क दिला आहे. शासन म्हणून सर्व घटकांचा सर्वांगीण विचार करावा लागतो, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.नाशिकमधील मोर्चामुळे राज्यातील राजकीय तापमान पुन्हा एकदा चढले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकींना उधाण आले आहे.