Crime News: शहरातील एका खाजगी शाळेतील अवघ्या ९ वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळा व्हॅन चालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ३० जुलै २०२५ रोजी दुपारी ही घटना घडली असून, ३१ जुलैला मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, पोलिसांनी ही गंभीर बाब प्रसारमाध्यमांपासून लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आता उफाळून आला आहे.
आरोपीचे नाव गणेश संपत म्हस्के (वय ३०) असून, तो गेली तीन वर्षे पीडित विद्यार्थिनीला शाळेत आणण्याचा व नेण्याचा काम करत होता. ३० जुलै रोजी सायंकाळी इतर विद्यार्थी उतरल्यावर काही अंतरावर व्हॅन थांबवून, गणेशने मुलीचा हात पकडत तिच्यावर अश्लील वक्तव्य केलं. “तू खूप क्युट आहेस, आपण उद्या फिरायला जाऊ” असे म्हणत तिला तिच्या आई-वडिलांना सांगण्यास भाग पाडले की “शाळेतून यायला उशीर होईल.
घाबरलेली मुलगी घरी गेल्यावर आईला हा प्रकार सांगितला. पालकांनी तत्काळ मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आणि न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या घटनेनंतर शहर पोलिसांनी प्रसारमाध्यमांपासून ही माहिती लपवली, असा आरोप नागरिकांनी केला आहे. शाळेच्या प्रतिमेचे रक्षण करण्यासाठी पोलिसांनी माहिती दडपली का?असा प्रश्न आता समाजात चर्चेला आला आहे.
या घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शाळा व्हॅन चालकांवरील देखरेखीचा अभाव, शाळांची जबाबदारी व पोलीस यंत्रणेचा निष्काळजीपणा यावर जोरदार चर्चा सुरू आहे. पालकांनी आणि सामाजिक संघटनांनी शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.