अहिल्यानगर | नगर सहयाद्री
मुंबई सायबर सेलच्या नावाने व्हीडीओ कॉल करून, ‘अवैध पार्सल’चा बनाव करून, शहरातील एका ५१ वर्षीय सिव्हील इंजिनीअरला ९ लाखाला गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी सावेडी परिसरात राहणाऱ्या इंजिनीअरला ‘राज आनंद’ या नावाने ब्लू डार्ट सर्व्हिसकडून व्हॉट्सअॅपवर कॉल आला. ‘तुमच्या नावाने अवैध पार्सल पाठवले जात आहे’, ‘तुमच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे’, असे भितीदायक संदेश पाठवून घाबरवण्यात आले. भामट्यांनी इंजिनीअरला ‘विजय पाल’ नावाच्या दुसऱ्या नंबरवर व्हीडीओ कॉल करून, ‘तुम्ही डिजिटल अरेस्ट झाला आहात’ असे सांगितले. ‘तुमचे बँक खाते चौकशीसाठी तपासावे लागेल’ अशी खोटी माहिती देऊन, इंजिनीअरच्या खात्यातील ९ लाख रुपये दुसऱ्या खात्यावर हस्तांतरित करायला भाग पाडले. २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला. पैसे परत न मिळाल्याने ३१ ऑक्टोबर रोजी इंजिनीअरने सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. सायबर पोलीस ठाण्यात राज आनंद आणि विजय पाल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोरेश्वर पैदाम करत आहेत.
ऐतिहासिक वास्तूंचे विद्रुपीकरण
करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर महानगरपालिकेने कडक कारवाई केली आहे. सावेडी येथील प्रोफेसर चौकातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या कंपाऊंड भिंतीवर ‘1 बीएचके, 2 बीएचके भाड्याने मिळेल’ असा विनापरवाना जाहिरात फलक लावल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी बाळासाहेब लक्ष्मण पवार (वय ५६) यांनी शुक्रवारी (दि. ३१) दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास ही बाब लक्षात घेतली. त्यांनी अतिक्रमण विभागाच्या पथकासह (देविदास बिज्जा, राहुल साबळे, रविंद्र सोनवणे) घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पथकाच्या पाहणीत, छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या लोखंडी ग्रीलवर २x१ फुटाचा फ्लेक्स बोर्ड आढळला. त्यावर ‘1 बीएचके, 2 बीएचके भाड्याने मिळेल’ असे लिहून मोबाईल क्रमांक दिला होता. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता लावलेला हा फलक ताबडतोब जप्त करण्यात आला. वरिष्ठांच्या सूचनेवरून बाळासाहेब पवार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून, मोबाईल क्रमांक धारकाविरोधात महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार खंडागळे करत आहेत.
पती-पत्नीला लाकडी दांडक्यांनी मारहाण
दुकानासमोर भाजीपाला लावण्याच्या जुन्या वादातून गांधीनगर परिसरात नातेवाईकांनी पती-पत्नीला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी कविता संतोष यादव (वय २८, रा. प्रेमभारती नगर) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे., कविता यादव आणि त्यांचे पती संतोष यांचे के. के. डेअरी बेकरीचे दुकान आहे. त्यांचे नातेवाईक संगिता, सरिता, शुभम, ज्योती, सुनिता आणि प्रियंका यादव दुकानाबाहेर भाजीपाला लावतात, ज्यामुळे नेहमीच वाद होत असल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी (दि. ३१) दुपारी दीड वाजता आरोपींनी दुकानात येऊन दाम्पत्यावर शिवीगाळ केली. त्यानंतर डायल ११२ वर फोन केल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांना पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सांगितले. मात्र दुपारी चार वाजता, पोलीस स्टेशनला जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. आणि सर्वांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शुभम, संगिता आणि ज्योती यादव यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करत दाम्पत्याला जखमी केले आणि जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आणि पुढील तपास पोलीस करत आहेत.
८० हजारांचे सोन्याचे गंठण लंपास
शहरातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीत आता वर्दळीच्या ठिकाणांनाही चोरटे डोळा लावू लागले आहेत. शुक्रवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास, एका ५१ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना माणिक चौक परिसरात घडली.केडगाव परिसरात राहणाऱ्या अंगणवाडी सेविकेने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. फिर्यादीनुसार, त्या शुक्रवारी (दि. ३१ ऑक्टोबर) रात्री साडेआठच्या सुमारास पती, मुलगा व मुलीसह चष्मा दुरुस्तीसाठी बाहेर निघाल्या होत्या. रात्री ८ वाजेच्या सुमारास काम आटोपून त्या माणिक चौकातील ‘आशिर्वाद चिवडा’ दुकानासमोरून जात असताना, मागून वेगाने आलेल्या केटीएम दुचाकीवर बसलेल्या दोन इसमांनी, तोंडावर रुमाल बांधून, महिलेच्या गळ्यातील गंठण लंपास केले. घटनेमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी दोन अज्ञात इसमांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.



