अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात पुन्हा हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. 26 व 29 डिसेंबर रोजी विजांच्या कडकडाटांसह मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता तसेच 27 व 28 डिसेंबर रोजी विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा, हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस व गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट वर्तविण्यात आला असून या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याने राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविली असून अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे.
मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणा-या / लोंबणा-या केबल्स् पासून दूर रहावे. जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज्) आजूबाजूला थांबू नये, धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी.
धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी शाहूराज मोरे यांनी केले आहे.