सुपा / नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील भोयरे गांगर्डा ते रुईछ्त्रपती फाटा लगत असलेल्या झाडांना आग लागून मोठे नुकसान झाले. यात शेकडो झाडे होरपळली. आग लागण्याच्या घटनेस जबाबदार असणार्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केले जात आहे.
मागील सात वर्षांपूर्वी भोयरे गांगर्डा ते रूईछत्रपती फाटा दरम्यान सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. यावर ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली मजूर लावण्यात आले. तीन वर्ष मुदतीत असलेल्या या मजूरांकडून दुतर्फा झाडांची साफ सफाई करणे, याठिकाणी कोणत्याही प्रकारची जनावरे येऊ न देणे तसेच झाडांना वेळेवर पाणी घालणे आदी कामे ठरवून देण्यात आली. याबाबत दैनिक नगर सह्याद्री ने देखील वेळोवेळी आवाज उठवून सामाजिक वनीकरणाला जाग आणली. सुमारे तीन वर्षांच्या या कालावधीत झाडांची वाढ देखील चांगल्या प्रकारे झाली.
या झाडांसाठी सामाजिक वनीकरणाने सुमारे वीस ते बावीस लाख रुपये खर्च केले. मात्र रस्त्यालगत असणार्या शेतजमीन मालकांकडून झाडांना आग लावली जात असल्याने झाडांची मोठी हानी होत आहे. यावर ना सामाजिक वनीकरणाचे लक्ष ना ग्रामपंचायतीचे ना पीडब्लूडीचे, झाडांना आग लावणार्या जागा मालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे.
दर वर्षी रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक निघाल्यानंतर शेतीची मशागत सुरू होते यादरम्यान शेतकरी आपल्या शेतात खत टाकणे, नांगरणी करणे आदी कामे करतात यादरम्यान शेताच्या कडेला असलेल्या ताली पेटवून देतात मात्र या ताली पेटवून दिल्याने पशू पक्षी व लाखो रुपयांची झाडे त्यात होरपळून निघत आहे. सुमारे तीन वर्षे पाणी घालून हे झाडे क्षणात नष्ट होत असल्याने शासनाच्या वतीने लाखो रुपये केलेला खर्च पाण्यात जात असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
जुन्या झाडांनाही आग, पशुपक्षी मृत्यूमुखी
भोयरे गांगर्डा ते रूईछत्रपती फाटा दरम्यान माळरान मोठ्या प्रमाणात आहे. या माळरानावर पुर्वीचे हजारो झाडे आहेत. या झाडांमध्ये मोर, ससा, हरण यासह पशुपक्षी वास्तव्यास आहेत. सुमारे २२ ते २५ एकर डोंगरावर असलेल्या झाडांना व पशुपक्ष्यांना या आगीचा फटका बसला. शेकडो प्राणी व पशुपक्षी मृत्यूमुखी पडले. तर झाडे होरपळून निघाली. शासनाच्या वतीने मझाडे लावा झाडे जगवाफ मोहीम राबवली जाते. मात्र विघ्नसंतोषी वृत्तीच्या लोकांकडून ती क्षणात नष्ट केली जाते. यावर शासनाच्या वतीने कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.