मुंबई। नगर सह्याद्री-
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठे बदल पहायला मिळत आहे. अनके ठिकाणी रखरखत्या उन्हाचा पारा चढतांना दिसत आहे. तर काही भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकरी संकटात राबद्दल आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याची पुन्हा चिंता वाढवणारी माहिती समोर आली असून विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठे बदल होत आहे. नागरिकांना कधी उन्हाच्या झळा, तर कधी अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे. तापमानाचा पार चाळीशीपार गेला असताना मराठवाडा आणि विदर्भात अधून मधून अवकाळी पावसाच्या सरी देखील कोसळत आहेत.
या पावसाचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. याशिवाय शेतीपिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे विदर्भावर उंच उंच ढग तयार होत आहेत. त्यामुळे ढगातील तापमान शून्य अंशांच्या खाली जाऊन गारांची निर्मिती होत आहे. यामुळे येत्या २४ तासांत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस होणार असून विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्याना हवामान खात्याने अलर्ट दिला आहे.