मुंबई / नगर सह्याद्री –
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. राज्यातील मनपाकडून प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यात गणेशोत्सावानंतर लवकरच प्रचाराचा धुरळा उडणार हे निश्चित झाले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, पिंपर चिंचवड, नागपूरसह राज्यातील सर्वच महत्त्वाच्या महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना या प्रारूप रचनेवर हरकती आणि सूचना मांडण्याची संधी मिळेल. 4 सप्टेंबर पर्यंत सूचना आणि हरकती नोंदवल्या जाणार आहेत. त्यानंतर 5 ते 12 सप्टेंबर दरम्यान नोंदवलेल्या हरकतींवर सुनावणी पार पडेल. सुनावणी पार पडल्यावर पुढच्या दोन दिवसांत म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत पालिका आयुक्त नगरविकास विभागाकडे अंतिम प्रभाग रचना सादर करतील.
मुंबईसह अ ब क वर्गातील अनेक महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर आणि नाशिक या महापालिकांचाही समावेश आहे. प्रारूप प्रभाग रचना ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पहिली पायरी मानली जाते. मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस प्रभागांची संख्या कायम ठेवण्यात आले आहेत. सागरी किनारा मार्ग, अटल सेतू आणि मेट्रोच्या बांधकामांचा प्रभाग रचनेत समावेश करण्यात आलाय. नवी मुंबईत १११ नगरसेवकांसाठी २८ प्रभाग, कल्याण-डोंबिवलीत १२२ जागांसाठी ३१ प्रभाग ठेवण्यात आले आहेत. पुण्यात ४१ प्रभाग असून, त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय ठेवला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ३२ प्रभाग आणि नाशिकमध्ये ३१ प्रभाग जाहीर झाले आहेत.
अहिल्यानगर महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शासन आदेशानुसार मनपाने जिल्हाधिकार्यांकडे प्रारूप प्रभाग रचना आराखडा सादर केला आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मनपा समितीने प्रभाग रचना केली आहे. ही रचना उत्तरेकडून झिकझॅक पद्धतीने सुरु करून दक्षिणेकडे साप्त केली आहे. नगर विकास विभागाने अहिल्यानगर महापालिका आणि बारा नगरपालिकांच्या प्रभागरचनेच्या कार्यक्रमात बदल केला आहे. महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना आता 3 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान प्रसिद्ध होणार आहे. तर 16 ते 22 सप्टेंबर दरम्यान उपलब्ध हरकतींवर सुनावणी होणार आहे. त्यानंतर अंति प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे.