अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील कल्पवृक्ष सोसायटीमध्ये सुरू असलेल्या इमारत बांधकामादरम्यान सातव्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. निशिकांत (वय 40, मूळगाव – पश्चिम बंगाल) असे मृत व्यक्तीचे नाव असून, तो सकाळी कामादरम्यान क्रेनसह 70 फूट उंचीवरून खाली पडला.
ही दुर्घटना बुधवार, 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता घडली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कामगार निशिकांत क्रेनच्या साहाय्याने पिण्याचे पाणी वर नेत असताना क्रेनचा तोल जाऊन तो थेट सातव्या मजल्यावरून खाली पडला. पडताना त्याच्या तोंडातून रक्ताची गुळणी बाहेर पडली आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर बांधकाम व्यावसायिकाने कोणत्याही सुरक्षात्मक उपाययोजना केल्या नव्हत्या, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊपर्यंत सुरू असलेले काम आणि परिसरातील गोंगाटामुळे शेजारील रहिवाशांचेही हाल होत असल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली घटनेनंतर तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली, मात्र तोपर्यंत निशिकांतचा मृत्यू झाला होता.
नेवासा पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले असून, त्यांच्या उपस्थितीत पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या अपघातानंतर तरी बांधकाम व्यावसायिकाने सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा कल्पवृक्ष सोसायटीच्या रहिवाशांनी व्यक्त केली आहे. तसेच कामगारांच्या सुरक्षेसोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करणं आवश्यक असल्याचे मत अनेकांनी मांडले.