अहिल्यानगर ।नगर सहयाद्री
बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे दागिने व चार हजाराची रोकड असा ऐवज चोरला. सुडके मळा, बालिकाश्रम रस्ता परिसरातील बँक ऑफ बडोदा कॉलनीमध्ये शनिवारी (२८ जून) सायंकाळी ४.१५ ते ७ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
मंगला कृष्णाजी केळकर (वय ७४, रा. २५, बँक ऑफ बडोदा कॉलनी, सुडके मळा, बालिकाश्रम रस्ता) यांनी रविवारी (२९ जून) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी एकट्याच घरी राहतात. त्यांचे दोन्ही मुले पुण्यात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. फिर्यादी त्या दिवशी दिल्लीगेट येथे आयोजित भजनाच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या.
सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाहून घरी परतल्यावर त्यांना घराच्या बेडरूमची खिडकी उघडी दिसली, आणि लोखंडी जाळी तुटलेली असल्याचे लक्षात आले. कपाट उघडे होते, कपडे अस्ताव्यस्त होते. तपासणी केल्यावर कपाटातील लॉकर फोडून त्यातील दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चोरीस गेलेला ऐवजामध्ये ७० ग्रॅमच्या दोन सोन्याच्या बांगड्या, ६ ग्रॅमची एक जोडी सोन्याचे टॉप्स, २० ग्रॅमच्या ५ सोन्याच्या अंगठ्या व ४ हजाराची रोकड यांचा समावेश आहे.या घटनेनंतर मंगला केळकर यांनी तत्काळ आपल्या मुलांना पुण्यातून बोलावून घेतले व तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. महिला पोलीस अंमलदार प्रमिला गायकवाड अधिक तपास करीत आहेत.