कोपरगाव । नगर सहयाद्री:-
राज्यभरात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असल्याचं पाहायला मिळतं आहे. कोपरगाव शहरात देखील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिला नाचवायच्या नाही तर वाचवायच्या आहेत, असे प्रतिपादन करत युवा नेते विवेक कोल्हे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
दहीहंडी उत्सवानिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी कुठली सिने कलाकार न बोलवता मंजूर येथे गोदावरीत वाहून जाणार्या युवकांना वाचविण्यासाठी आपली साडी पाण्यात फेकणार्या ताईबाई पवार यांना निमंत्रित करण्यात आले होते.
तर आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने देखील दहीहंडी उत्सवा चे आयोजन करण्यात आले होते. तर गोविदांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती दहीहंडी उत्सव कमिटीचे अध्यक्ष यांनी दिली होती.
दरम्यान सजीवनी युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीत ‘महिला नाचवायच्या नाही तर वाचवायच्या आहेत’ या आशयाचे फलक युवकांनी झळकावले. त्यावर भाष्य करताना विवेक कोल्हे यांनी महिलांचा आदर करणारे युवक घडवणे हे आपले ध्येय आहे.ज्यावेळी कौरव पांडव यांच्या युद्धात योग्य मार्गदर्शक पांडवांच्या बाजूने श्रीकृष्णाच्या रूपाने होता. त्यामुळे असे उत्सव साजरे करताना आपण योग्य आदर्श मिळणारे केंद्र शोधल्याने आपले जीवन नक्कीच बदलत असल्याचे सांगितले.