Politics News: राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांनी खंडणी प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं असून, आरोपी महिलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केल्याचे उघड झाले आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून, सापळा रचून महिलेला १ कोटी रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
संबंधित महिलेकडून मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर काही आरोप करण्यात आले होते. मात्र या आरोपांचे गांभीर्य आणि खरेपणा तपासण्यात असतानाच या प्रकरणातून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेने थेट ३ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. सातारा पोलिसांनी यासंबंधी माहिती मिळताच कारवाईची आखणी केली. पोलिसांनी सापळा रचून महिलेला १ कोटी रुपये घेताना अटक केली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जयकुमार गोरे हे भाजपचे वरिष्ठ नेते असून सध्या राज्यात ग्रामविकास मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्यावर लागलेले आरोप आधीच चर्चेचा विषय ठरत होते. आता त्या आरोपांमागे खंडणीचा डाव असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी महिलेविरुद्ध ठोस पुरावे असून पुढील चौकशीदरम्यान आणखी बाबी समोर येण्याची शक्यता आहे. पोलिस प्रशासन याप्रकरणी गंभीर असून कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.