अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यात वाळू व गौण खनिज तस्करांचे कारनामे नेहमीच समोर येत आहेत. वाळू तस्करांची दादागिरी अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. कारवाई करण्यासाठी येणाऱ्या पथकावर हल्ले करण्याचे प्रकार कायम समोर येत असतात. अशात आता दादागिरी करत शेतातून वाळूने भरलेले वाहन घेऊन जाणाऱ्यांना विचारणा केल्याने वाळू तस्करांनी शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नाही तर डंपर खाली घालून चिरडण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर तालुक्यातील शिंगवेमध्ये समोर आला आले.
एकीकडे सरकारने वाळू धोरण आखून प्रत्येक नागरिकाला मागेल तेवढी वाळू कमी दरात उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली होती. मात्र ही योजना आता फक्त कागदावरच असून सर्वसामान्य लोकांना वाळू ही जास्त दरानेच विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे अजूनही वाळू तस्कर राजरोसपणे वाळू तस्करी करताना दिसून येत आहे. नगर तालुक्यातील शिंगवे परिसरात वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला असून तस्करीला आडवा येणाऱ्यास मारहाण करण्यात येत असल्याच्या घटना शिंगवे परिसरात घडत आहेत.
वाळू तस्कर हे शेतकऱ्यांच्या जमिनीतून राजरोसपने वाळू तस्करी करत असल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान होत आहेत. तसेच गावातून वाळू वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरमुळे विद्याथ आणि नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. मात्र याबाबत वाळू तस्करांना जाब विचारण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना मारहाण होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.अहिल्यानगरच्या शिंगवे गावातील शेतकरी प्रकाश पुंड यांनी वाळू तस्करांकडून होत असलेल्या या दादागिरीमुळे जाब विचारला असता वाळू तस्करांनी पुंड यांच्यावर जीवघेणा हल्ला करत मारहाण केली.
कुटुंबातील महिलांदेखत प्रकाश पुंड यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तर त्यांना सोडवण्यास गेलेल्या वयोवृद्ध महिलांनाही डंपर खाली घालून मारण्याची भाषा वाळू तस्करांनी केल्यामुळे महिला भयभीत झाल्या. यामुळे आम्हाला कोणीतरी न्याय द्यावा संरक्षण द्यावे अशी मागणी आता शिंगवे गावातील ज्येष्ठ महिला परीघा पुंड यांनी केली आहे.