भावासह कुटुंबालाही मारहाण | बुरूडगाव येथील घटना
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगर तालुयातील बुरुडगाव येथे मला बघून दरवाजा का बंद केला? या क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीने महिलेसह तिच्या संपूर्ण कुटुंबाला शिवीगाळ व मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने भाजी कापण्याच्या चाकूने महिलेच्या हातावर वार करून तिला जखमी केले.
ही घटना रविवारी (दि. २६) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बुरुडगाव येथील पाचारणे मळ्यात घडली. याप्रकरणी विजय केरु पाचारणे (रा. बुरुडगाव, ता. जि. अहिल्यानगर) याच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पीडित महिला (वय ३७, रा. नागरदेवळे) या बुरुडगाव येथील आपल्या माहेरी आल्या होत्या. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आरोपी विजय पाचारणे हा त्यांच्या दाराजवळ आला. फिर्यादी महिलेला पाहून, तू मला बघून दरवाजा का बंद केला? असा जाब विचारत त्याने महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.यावेळी महिलेचा भाऊ किरण हा वाद सोडवण्यासाठी पुढे आला असता, आरोपीने त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आपल्या भावाला होणारी मारहाण पाहून फिर्यादी महिला, तिची मुले आणि बहीण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करत धक्काबुक्की व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याच झटापटीत आरोपी विजय पाचारणे याने त्याच्याकडील भाजी कापण्याच्या चाकूने फिर्यादी महिलेच्या उजव्या हाताच्या मनगटावर वार करून दुखापत केली.
घडलेल्या प्रकारानंतर पीडित महिलेने रविवारी सकाळी नगर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. आरोपी विजय पाचारणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते हे करीत आहेत.



