अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून दोन वेळा आमदारकी भूषवलेले माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (२ मे) सायंकाळी सहाच्या सुमारास नगरच्या अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो काका प्रेमींनी साश्रू नयनांनी शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक अशा सर्वच क्षेत्रातील हजारो नागरिक उपस्थित होते. राज्य शासनाच्यावतीने क्रीडामंत्री दत्ता भरणे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी सुधीर पाटील व तहसिलदार संजय शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. पोलिसांनी शोक धून वाजवल्यावर बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली.
मागील सुमारे महिनाभरापासून आजारपणामुळे अरुणकाका जगताप यांच्यावर पुण्याच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर दुपारी त्यांचे पार्थिव भवानीनगर येथील घरी आणण्यात आले. यावेळी अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी चारच्या सुमारास फुलांनी सजवलेल्या रथातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ‘अरुणकाका अमर रहे…’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. गुणे आयुर्वेद महाविद्यालयात काही काळ पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास अमरधाम मध्ये अंत्ययात्रा आली. सायंकाळी सहाच्या सुमारास सूर्यास्त होतानाच अरुणकाका या महापर्वाचा अरुणास्त झाला. अरुणकाकांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप यांनी चंदनाच्या चितेवर अरुण काका जगताप यांना अग्नीडाग दिला. यावेळी आ.संग्राम जगताप यांच्यासह जगताप कुटुंबियांचे सर्व आप्तेष्ट उपस्थित होते.
अनेकांनी दिला आठवणींना दिला उजाळा
यावेळी अमरधाम मध्ये एव्हढी प्रचंड गर्दी झाली होती की पाय ठेवायलाही जागा नव्हती. यावेळी झालेल्या शोक सभेत अरुणकाका जगताप यांना श्रद्धांजली वाहताना अनेकांनी त्यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला. क्रीडामंत्री दत्ता भरणे म्हणाले, अरुणकाकांच्या तब्येतीत होणारी सुधारणा पाहता ते जातील असे वाटत नव्हते, परंतु अचानक काळाचा आघात अहिल्यानगरचा परिसर व जगताप परिवारावर झाला आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने जगताप परिवाराला व नगरकरांना द्यावी, असे ते म्हणाले.
माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले म्हणाले, अरुणकाका जगताप गरिबांचा आधारवड व जगताप- कर्डिले- कोतकर कुटुंबियांचा आधारस्तंभ होते. अरुणकाकांचा जीवनपट पाहता असा माणूस पुन्हा जन्माला येईल असे वाटत नाही. अनेक गोरगरिबांचे संसार त्यांनी उभे केले. नुसते अहिल्यानगर नव्हे बीड, संभाजीनगर व पुणे जिल्ह्यात त्यांचा मित्रपरिवार होता. अनेकांना आधार देण्याचे काम त्यांनी केले, परंतु जो आवडे लोकांना तोच आवडे परमेश्वराला असे बोलले जाते. आज अमरधाम मध्ये जमलेला जनसमुदाय पाहता काकांनी लोकांवर केलेले प्रेम व समाजासाठी केलेले कार्य यातून स्पष्ट होते. एवढा जनसमुदाय पाहिल्यावर आमच्या कर्डिले-कोतकर- जगताप परिवाराचे दुःख हलके होईल, अशी भावना आमदार कर्डिले यांनी व्यक्त केली.
बीडचे आमदार सुरेश धस यांनी काकांविषयीची आठवणींना उजाळा दिला. आमचा आधारस्तंभ हरपला आहे. काका सामान्यांचे दुःख ऐकायचे व एक घाव दोन तुकडे अशा पद्धतीने समस्येवर तोडगा ते काढायचे. आम्हाला त्यांचा खूप आधार होता, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. नगरचे माजी खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले, अरुणकाकाच्या निधनाने नगरचे राजकीय व्यासपीठ हरपले आहे. अरुण काका म्हणजे दिलदार व्यक्तिमत्व व मार्गदर्शक होते. त्यांनी मला नेहमी मुलासारखी वागणूक दिली. देवगड दत्त देवस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांनीही फोनवरून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी अमरधाम मध्ये खासदार निलेश लंके, मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, पारनेरचे आमदार काशिनाथ दाते, संगमनेरचे आमदार अमोल खताळ, नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यासह माजी मंत्री बबनराव पाचपुते, पुण्याचे माजी आमदार सुनील टिंगरे, श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे संभाजी कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब भोस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक वाल्मीक कुलकर्णी, विक्रम राठोड व अंबादास पंधाडे, पुण्याचे माजी महापौर अंकुशराव काकडे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, आष्टी पाटोद्याचे माजी आमदार दरेकर नाना व भीमराव धोंडे, मंगल भक्त सेवा मंडळाचे राजाभाऊ कोठारी महाराज, हर्षदा काकडे, माजी आमदार राहुल जगताप, नगर तालुका बाजार समितीचे माजी सभापती भानदास कोतकर, माजी आमदार दादा कळमकर, सचिन जाधव, दामोदर बठेजा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, विनायक देशमुख, उबेद शेख, दत्ता पानसरे, संपत मस्के, सुजित झावरे, घनश्याम शेलार, नंदकुमार मणियार, सचिन देसरडा, संतोष बोरा, रितेश नय्यर आदीसह अनेकांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली. मैत्री जपणारा माणूस, गरिबांचा कैवारी, जिल्ह्याचे काका, कोहिनूर हिरा, जिल्ह्याचे वैभव, वारकरी वारसा जपणारा भाविक, सर्व धर्म समभाव जपणारा समाजसेवक अशा शब्दात अनेकांनी अरुण काकांच्या आठवणींना उजाळा दिला.