पवारांनी एकदा तरी एक मराठा लाख मराठा म्हणून दाखवावे!
शिर्डी / नगर सह्याद्री –
मराठा आरक्षणाचे खरे शत्रू कोण हे आता मराठा समाजाने ओळखावे, चार वेळा मुख्यमंत्री राहून सुद्धा एकदाही मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली नाही.केवळ मताचे राजकारण करत समजा समाजात दुही माजवयाची आणि आपली राजकीय समीकरणे मांडायची अशी बोचरी टीका राज्याचे महसूल तथा दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांचे नाव न घेता विधानसभेत केली. समाजातील लोकांना झुलवत ठेवण्याचे मोठे षडयंत्र आखले जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मराठा आरक्षणावर महायुतीने काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला महाविकास आघाडीने न जाण्याचा निर्णय घेतला.त्यावरून आज विधानसभेत गदारोळ झाला.महायुतीच्या सर्व नेत्यांनी विरोधीपक्षाला धारेवर धरत बैठकीला येण्यापासून तुम्हाला कोणी रोखले कोणाचे मेसेज आले याचा खुलासा करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.याच मुद्द्यावरून मंत्री विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला.
मंत्री विखे पाटील यांनी नाव न घेता शरद पवारांवर स्पष्ट आरोप केले की, चार वेळा मुख्यमंत्री राहूनही त्यांनी आजतागायत मराठा आरक्षणाच्या बाजूने कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली नाही, कधी मराठा आरक्षणाच्या बाजूने ब्र शब्द काढला नाही, ते कोणत्याही मोर्चात दिसले नाहीत. त्यांनी कधीही आरक्षणाच्या बाबतीतील आपली भूमिका समाजाच्या समोर मांडली नाही. अशा परखड शब्दात त्यांनी पवारांवर निशाणा साधला. त्याच बरोबर मंत्री विखे यांनी महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री केवळ फेसबुकवर होते. तर त्यांचे नेते रिमोटकंट्रोल वर काम करत राहिले. यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण गमवावे लागले असल्याचा थेट आरोप केला.
आजही अशाच भूमिकेतून समाजाची दिशाभूल करण्याचे काम विरोधक आणि महाविकास आघाडीचे नेते करत असल्याची टिका करून विखे पाटील यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना आवाहन केले की, त्यांनी मराठा आरक्षणाचे खरे शत्रू कोण हे आतातरी ओळखावे आणि अशा नेत्यांना गावबंदी करावी.
महायुती सरकार हे मराठ्यांच्या बाजूने असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. यासाठी सरकारने एक पाऊल पुढे येऊन सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकून ते मराठा आरक्षणाच्या विरोधात असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. यामुळे त्यांच्या या बेगडी मराठा प्रेमाचा आम्ही निषेध करत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.