पारनेर । नगर सहयाद्री:
तालुक्यातील चिंचोली मधील बांगरवाडीतील कोकणे परिवारातील कु. स्नेहल बाबू कोकणे हिची ठाणे पोलीस दलामध्ये निवड झाली आहे. ही निवड पोलीस भरती प्रक्रियेमधून झाली असून निकाला नंतर कुटुंबीय व नातेवाईक मित्र परिवार यांच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला.
शेतकरी कुटुंब परंतु जिद्द मनाशी ठेवून गेल्या दोन वर्षापासून प्रचंड मेहनत कष्ट करत पोलीस दलात जायचेच ही मनाशी खूनघाट बांधून खाकीचे स्वप्न रंगवत प्रयत्न करत असलेली स्नेहल कोकणे हिला अखेर २०२४ मध्ये झालेल्या पोलीस भरती मध्ये यश मिळाले आणि ठाणे पोलीस दलामध्ये तिची निवड झाली. निवडीनंतर वडील बाबू कोकणे व आई लता कोकणे या स्नेहलच्या मातापित्यांच्या चेहऱ्यावर मुलीच्या कष्टाला अखेर मिळालेल्या यशाचा आनंद दिसून येत होता.
कु. स्नेहल कोकणे ही चिंचोली येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी परंतु मोठी बहीण आशा कोकणे-शिंदे पोलीस दलामध्ये असल्याने खाकी वर्दीचे लहानपणापासूनच स्वप्न उराशी बाळगून ते पूर्ण करण्यासाठी ती प्रयत्न करत होती. मोठी बहीण शितल आणि सोनाली यांचा पण तिला पाठींबा होता. प्राथमिक सातवी पर्यंतचे शिक्षण चिंचोली येथे पूर्ण केल्यानंतर दहावीपर्यंत माध्यमिक शिक्षण दहा किलोमीटर वडझिरे येथे जाऊन सुंदराबाई गहिनाजी लंके विद्यालयात पूर्ण केले.
व पुढे अकरावी व बारावी पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात त्यानंतर पुढे पदवीच्या शिक्षण न्यू आर्ट्स अँड कॉमर्स सायन्स कॉलेज पारनेर येथे घेत असताना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली व अभ्यास करत असतानाच खाकी वर्दीचे असलेले स्वप्न कु. स्नेहलला स्वस्त बसू देत नव्हते. श्लोक अकॅडमी पारनेर येथे अविनाश परांडे सर, मुंबई पोलीस महेंद्र शेळके, ठाणे शहर पोलीस रामा शेळके, ठाणे शहर पोलीस स्वप्निल चौधरी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पोलीस भरतीची तयारी सुरू केली यश अपयशाची पायरी चढत तयारी ही सुरू होती. अखेर २०२४ मध्ये दि. ३ सप्टेंबर मध्ये पोलीस भरतीच्या माध्यमातून प्रयत्नांना व कष्टाला यश मिळाले १५० पैकी १३१ गुण घेऊन ठाणे पोलीस दलामध्ये निवड झाली.
निवडीनंतर चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी गावांमधील ज्येष्ठ ग्रामस्थ महिला युवक यांनी फोन करून स्नेहलला शुभेच्छा देत तिच्या यशाचे कौतुक केले. उद्योजक संतोष हिंगडे, अमोल हिंगडे, चिंचोली गावचे माजी सरपंच सतीश पिंपरकर, निघोज येथील प्रसिद्ध ग्राफिक डिझायनर अशोक बाबर, पत्रकार गणेश जगदाळे यांनी निवडीबद्दल विशेष अभिनंदन केले आहे.