पुणे । नगर सहयाद्री
सोशल मीडियावर टाळकी भडकावण्याचं कामं सुरू आहेत. महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झालाय. मते मिळवण्यासाठी तुमची डोके फोडून घेतली जात आहेत. आग लावण्याची कामे केली जात आहेत, हे आपल्या लोकांना समजत नाही, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी राजकीय पक्षांवर केलाय. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनी बोलत होते. पिंपरी चिंचवड येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
राज ठाकरेंनी राजकीय नेत्यांवर जोरदार फटकेबाजी केली. विविध मुद्दावर त्यांचे मत मांडले. तर यावेळी त्यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी मेळाव्याला येण्याचे आवाहन केले. दरम्यान या वर्धापनदिनी बोलताना राज ठाकरे म्हणाले, राज्याच्या राजकारणाचा चिखल झालाय. मते मिळवण्यासाठी तुमची डोके फोडून घेतली जात आहेत. आग लावली जात आहे, मात्र हे आपल्या लोकांना समजत नाहीये.
सोशल मीडियावर लोकांची माथी भडकवण्याचे काम करण्यात येत असल्याची टीका त्यांनी केली. राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर आपण गुढी पाडव्याच्या दिवशी सविस्तर बोलणार आहोत. वीस दिवसांवर गुढी पाडव्याचा मेळावा आहे. तिकडे मी दांडपट्टा फिरवणार आहे, त्यामुळे आता चाकू सुरे कशाला काढू असी मिश्किल टिप्पणी त्यांनी यावेळी केली.
जनतेची दिशाभूल करण्यासाठी जातीपातीचे विषय काढले जातायेत. सोशल मीडियातून तुमची टाळकी भडकवले जात आहेत. जाणूनबुजून हे उद्योग सुरू असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केलाय. यावेळी वांद्रे वरळी सी लिंक प्रकल्पावरूनही त्यांनी टोला मारला. प्रभू रामचंद्रांना जेव्हा वनवास झाला. प्रभू रामचंद्रांना हनुमान भेटले. लंकेत गेले. रावणाला मारलं. सीतामाईला घेऊन आयोध्येला आले. कुठे आयोध्या, दंडकारण्य, कुठे लंका प्रभू रामचंद्रांनी सेतू बांधला. हे हे सर्व १४ वर्षात घडलं. पण आजच्या काळात वांद्रे वरळी सी लिंकला १४ वर्षे लागली अशी फटकेबाजी राज ठाकरेंनी केली.