Politics News: सध्या महाराष्ट्रात मान्सूनपेक्षा राजकीय मनोमिलनाचे वारे जोरदार वाहू लागले आहे. अशातच दुरावलेले काका-पुतणे एकत्र येणार का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारला असता त्यांनी फार सूचक उत्तर दिले आहे. 10 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्तानं होणाऱ्या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेतलं जाईल आणि मग पुढचा निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्या(मंगळवारी,ता 10) वर्धापनदिन आहे. दरम्यान वर्धापानदिनाच्या एक दिवस आधी आज (सोमवारी,ता 9) शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावर येणार आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, हसन मुश्रीफ देखील उपस्थित राहणार आहेत. राज्यातील साखर कारखाने, सहकारी बँका, साखर उद्योगाशी संबंधित अधिकारी यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळतेय. कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी ‘एआय’वर चर्चा सत्र होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा 26 वा वर्धापनदिन उद्या (10 जूनला) सकाळी 10.10 वाजता शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन, येथे ध्वजारोहण होणार आहे. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिर येथे पक्षाचा मेळावा सकाळी 10.30 ते 1.10 या वेळेत होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
26 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच पुणे शहराला वर्धापनदिनाच्या यजमान पदाचा मान मिळाला आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात साजरा होत असलेला हा वर्धापनदिन पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देणारा, ताकद देणारा ठरेल हा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन देखील उद्या पुण्यात पार पडणार आहे.