मुंबई | नगर सहयाद्री
राज्याच्या महायुती सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता आहे. ‘रमी’ प्रकरणामुळे चर्चेत आलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलले जाणार असून, शिवसेनेच्या (शिंदे गट) सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासह काही इतर मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. या दौऱ्यात राज्यातील राजकीय घडामोडींवर आणि मंत्रिमंडळातील वादग्रस्त मंत्र्यांबाबत चर्चा झाल्याचे समजते. जरी फडणवीस यांनी या भेटी ‘विकासप्रकल्पां’साठी असल्याचे सांगितले, तरी मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चांना त्यामुळे अधिक बळ मिळाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक भूमिका घेत असून, खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार कोकाटेंना पूर्णपणे मंत्रिमंडळातून काढण्यास सध्या तयार नसल्यामुळे त्यांचे खाते बदलून त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटातील सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावरही नाराजी असल्याचे संकेत आहेत. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर सातत्याने वादग्रस्त विधानं आणि कार्यपद्धतीमुळे टीका होत असल्याने, सरकारची प्रतिमा डागाळली जात असल्याची वरिष्ठांची चिंताही आहे.
राज्यातील प्रमुख महापालिका निवडणुका जवळ आल्या असताना भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाची युती केवळ मुंबईपुरतीच मर्यादित राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येते. ठाण्यात शिंदे गट भाजपसोबत युतीसाठी आग्रही असला, तरी स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध असल्याचेही समोर आले आहे.