मुंबई । नगर सहयाद्री:-
आंतरधर्मीय विवाहांच्या नावाखाली होणाऱ्या ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अशा प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे.
राज्य सरकारने पोलिस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली ही समिती गठीत केली आहे. ही समिती इतर राज्यांनी ‘लव्ह जिहाद’ आणि जबरदस्तीने किंवा फसवणूक करून केल्या जाणाऱ्या धर्मांतराविरोधी केलेल्या कायद्यांचा अभ्यास करणार आहे. त्यानंतर, समिती कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारला शिफारशी सादर करेल.
गृह विभागाने शुक्रवारी यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केला आहे. या समितीत महिला आणि बालविकास, अल्पसंख्याक विकास, विधी आणि न्याय, सामाजिक न्याय विभागांचे अतिरिक्त प्रधान सचिव//सचिव तसेच गृह विभागाच्या विधी शाखेचे सहसचिव किंवा उपसचिव सदस्य असतील. गृह विभागाचे सहसचिव अथवा उपसचिव हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
‘लव्ह जिहाद’ च्या घटनांना आळा घालणे, हा या समितीचा मुख्य उद्देश आहे. आंतरधर्मीय विवाहानंतर उद्भवणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ही समिती काम करणार आहे.सध्या, समितीला अहवाल सादर करण्यासाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा देण्यात आलेली नाही. याचा अर्थ समिती सखोल अभ्यास करून आणि सर्व बाबींचा विचार करून आपला अहवाल सादर करणार आहे.