अहिल्यानगर । नगर सहयाद्री
वारंवार नोटीसा देऊन, पाठपुरावा करूनही महापालिकेने पाणी पुरवठ्याची वीज बिले भरलेली नाहीत. महापालिकेकडे चालू बिलांची 11 कोटी रुपयांची थकबाकी आहे. किमान पाच कोटी रुपये जमा करण्यात येतील, असे महापालिकेने सांगितले आहे. मात्र, किमान पाच कोटी रुपये थकीत बीलांपोटी न भरल्यास पाणी पुरवठा योजनेची वीज खंडित करण्यात येणार असल्याची माहिती महावितरण कंपनीने दिली आहे.
महानगरपालिकेची वीज बिलाची जुनी थकबाकी 100 कोटींपेक्षा अधिक आहे. चालू बिलांपैकी महापालिकेने काही रक्कम भरली आहे. मात्र, अद्यापही 11 कोटी रुपयांची थकबाकी कायम आहे. महावितरण कंपनीकडून वेळोवेळी नोटीसा देऊन, पाठपुरावा करून थकबाकी भरण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. गेल्या आठवडाभरापासून महापालिका अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा सुरू आहेत. मात्र, थकबाकी जमा झालेली नाही. दोन दिवसांपूव झालेल्या चर्चेवेळी थकीत रकमेपैकी किमान पाच कोटी रुपये लवकरच जमा केले जातील, असे सांगण्यात आले आहे.
मार्च एंडच्या अगोदर महापालिकेने थकीत बिलांपोटी 5 कोटी रुपये न भरल्यास शहर पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरण कंपनीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यापासून महापालिकेने कर वसुली वाढवण्यासाठी शास्ती माफी केली आहे. यात आत्तापर्यंत अवघे 17 कोटी रुपये वसूल झाले आहेत. थकबाकीदारांचा प्रतिसाद मिळत नसताना, महापालिकाही कठोर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे थकबाकी वाढून आर्थिक अडचणी वाढत आहेत. महापालिकेने वीज बिलांच्या थकबाकीबाबत तोडगा न काढल्यास वीजपुरवठा खंडित होऊन शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.