अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
सध्या महाराष्ट्रासह देशभरात थंडीचा कडाका प्रचंड वाढल्याचं दिसून येत आहे. उत्तरेकडील थंडी वाऱ्यांनी महाराष्ट्रात थंडीची लाट टिकून आहे. अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली घसरल्याने हुडहुडी कायम आहे. गेल्या तीन दिवसांपासून अहिल्यानगरच्या तापमानात चढ-उतार होते आहे. बुधवारी नगरचे तापमान ७.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. होते. त्यामुळे गारठ्याने नगरकर पुन्हा कुडकुडले.
दरम्यान, पुढचे तीन दिवस ढगाळ वातावरणाबरोबरच धुके पसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ व अवकाळी पावसामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, गेल्या आठवड्यात पुन्हा थंडीत वाढ होण्यास सुरुवात झाली. रविवारी शहराचे किमान तापमान ६.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. सोमवारी त्यात पुन्हा घट होऊन ५.५ इतके नीचांकी तापमान नोंदवण्यात आले. मंगळवारीदेखील ५.५ अंश तापमान कायम होते.
गेल्या सहा वर्षात प्रथमच सर्वात कमी तापमानाची नोंद सोमवारी, मंगळवारी झाली. मात्र, बुधवारपासून शहराच्या तापमानात वाढ होताना ७.४ अंश सेल्सिअस झाले होते. दरम्यान १९ ते २४ डिसेंबरदरम्यान थंडीचा कडाका काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. थंडीचा कडाका वाढल्याने सकाळी रस्त्यावरील वाहतूक कमी झाली आहे. सकाळी दाट धुक्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांसाठी वाढलेली थंडी उपयुक्त असल्याचे मानले जाते. मात्र, अचानक हवामान बदल होऊन ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्याच्या तापमानात चढ-उतार
मंगळवार (ता. १०) : १२ अंश सेल्सिअस, बुधवार (ता. ११) : १३ अंश सेल्सिअस, गुरुवार (ता. १२) : १४ अंश सेल्सिअस, शुक्रवार (ता. १३) : १२. ०९ अंश सेल्सिअस, शनिवार (ता. १४) : १२ अंश सेल्सिअस, रविवार (ता. १५) : ०६ .०४ अंश सेल्सिअस, सोमवार (ता. १६) : ०५ .०५ अंश सेल्सिअस, मंगळवार (ता. १७) : ०५ .००५ अंश सेल्सिअस, बुधवार (ता. १८) : ०७. ०४ अंश सेल्सिअस