बारामती / नगर सह्याद्री –
दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे सर्वदूर उत्साहाचे वातावरण आहे. घराघरात फराळ तयार करण्याची लगबग होताना दिसत आहे. दिवाळीच्या निमित्ताने राजकीय नेते मंडळींकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दिवाळीच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या जातात. सर्वांसाठी दिवाळी सण उत्सावाचा आणि चैतन्याचा असतो.
पवार कुटुंबासाठी देखील दिवाळी अत्यंत महत्वाचा सण असतो. या सणाचे औचित्य साधत पवार कुटुंबातील सर्व सदस्य बारामतीत एकत्र येत दिवाळी साजरी करतात. मात्र, यंदा पवार कुटुंबीय दिवाळी सण म्हणजेच दिपावली पाडव्याच्या दिवशी एकत्र येणार नाहीत, असा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत दिली आहे.
पवार कुटुंब दिवाळी निमित्त एकत्र येणार नाही याचे कारण म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या काकी सौ. भारती प्रतापराव पवार यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या आम्हा सर्वांसाठी आईसमान होत्या, असे सुप्रिया सुळे ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बारामती येथील गोविंदबाग येथे होणाऱ्या दिवाळी पाडव्यानिमित्त भेटीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
आमच्या काकी सौ भारती प्रतापराव पवार यांचे नुकतेच निधन झाले. त्या आम्हा सर्वांसाठी आईसमान होत्या. म्हणूनच आम्ही सर्व पवार कुटुंबीयांनी मिळून यावर्षीची दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी गोविंदबाग, बारामती येथे होणारी दिवाळी आणि दिवाळीच्या पाडव्यानिमित्त…
खासदार सुप्रिया सुळेंचे ट्वीट
आमच्या काकी सौ भारती प्रतापराव पवार यांचे नुकतेच निधन झाले. त्या आम्हा सर्वांसाठी आईसमान होत्या. म्हणूनच आम्ही सर्व पवार कुटुंबीयांनी मिळून यावर्षीची दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी गोविंदबाग, बारामती येथे होणारी दिवाळी आणि दिवाळीच्या पाडव्यानिमित्त होणारा सहृदांच्या भेटीचा कार्यक्रम देखील यावर्षी होणार नाही, कृपया आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी. आपणा सर्वांना ही दिवाळी आनंदाची, सुखसमृद्धीची आणि भरभराटीची जावो ही सदिच्छा, अशी माहिती सुप्रिया सुळेंनी दिली.
दरवर्षी पवार कुटुंब दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने गोविंदबाग येथे एकत्र येते. या दिवशी पवार कुटुंबाचे समर्थक, पदाधिकारी, कार्यकर्ते असे सर्वच जण गोविंदबागेत दाखल होत असतात. या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक महत्व असते. पण यंदा मात्र, पवार कुटुंबिय दिवाळी साजरी करणार नसल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.