संगमनेर । नगर सहयाद्री:-
तीन पक्षांच्या सहकार्याने महाराष्ट्रात महायुतीने सत्ता स्थापन केली आहे. मात्र मंत्रिमंडळातील महायुतीच्या नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव, अविश्वास आणि गोंधळाचे वातावरण आहे. सत्तेच्या सिमेंटमुळे महायुती टिकून असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.
संगमनेर येथे माध्यमांशी संवाद साधताना थोरात यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. थोरात म्हणाले, मंत्रिमंडळात समन्वय नाही, परस्परांत लाथाळ्या सुरू आहेत. निधीच्या बाबतीत घोटाळ्यांचे प्रकरण उघडकीस येत असून, मुख्यमंत्री नगरविकासचा निधी स्वतःकडे घेणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. महायुतीत अविश्वास आणि गोंधळाचे वातावरण आहे, फक्त सत्तेच्या सिमेंटमुळे ती टिकली आहे, असे थोरात म्हणाले.
महाराष्ट्राची अधोगती झाली असून, राजकीय वातावरणात अनुचित वर्तन वाढले असल्याचे ते म्हणाले. आमदारच नव्हे तर त्यांचे भाऊही गोळीबार करीत असल्याच्या घटनांवर थोरात यांनी चिंता व्यक्त केली. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ला, कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण आणि विधीमंडळातील गुंडांमुळे घडणाऱ्या दादागिरीसारख्या घटना राज्यासाठी घातक असल्याचा त्यांनी उल्लेख केला.
रमी गेम खेळण्याबाबत माणिकराव कोकाटे चुकले हे मान्य आहे. मात्र इतर मंत्र्यांच्या अनेक गोष्टी सुरू आहे. त्याकडे कुणाचे लक्ष नाही. काही स्कँडल पुढे येतात, मात्र त्याबद्दल प्रसारमाध्यमात हवी तेव्हढी चर्चा नाही. टेंडरमध्ये हजारो कोटींचे घोटाळे केले जात आहेत. तसेच ज्या मंत्र्यांचे उद्योग मिडीयात आले त्यांचा राजीनामा घ्यायला हवा. मात्र इतर मंत्र्यांचे जे उद्योग सुरू आहेत, त्यांना रोखणार की नाही? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अशा लोकांना मुभा दिली आहे का? असा सवाल देखील थोरात यांनी केला आहे.